डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. जयश्री अय्यर यांचे निधन

वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री अय्यर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यातर्फे प्राचार्या जयश्री अय्यर यांची श्रद्धांजली सभा उद्या, 27 मार्च रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

प्राचार्या डॉ. जयश्री अय्यर या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांचा अनेक वर्षे विद्यार्थ्यांना सहवास लाभला होता. त्यांचे पार्थिव विद्यार्थी व कर्मचारी तसेच प्राध्यापक यांच्या दर्शनासाठी महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि सचिव संजीव बावधनकर यांनी त्यांचे पती गोपाळकृष्ण अय्यर आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. आनंद आंबेडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.