रेखा जरे हत्याकांडातील तक्रारदाराची न्यायालयासमोर सरतपासणी; घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य तक्रारदाराची गुरुवारी न्यायालयासमोर सरतपासणी घेण्यात आली. त्यात त्यांनी सर्व घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी या खटल्याची सुनावणी 8 डिसेंबर रोजी ठेवली आहे. येथील यशस्विनी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमध्ये आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा जरे यांची आई तक्रारदार सिंधुताई वायकर यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांची गुरुवारी न्यायालयासमोर तपासणी करण्यात आली. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या प्रकरणासंदर्भामध्ये वायकर यांना त्या दिवशीचा झालेला प्रसंग व इतर माहिती न्यायालयासमोर विचारली. यावेळी सिंधुताई यांनी घटनेच्या दिवशी मी माझा नातू कुणाल तसेच विजया माने आम्ही रेखा जरे तिच्यासमवेत पुणे या ठिकाणी डॉक्टर तपस्वी यांच्याकडे माझी तब्येत दाखवण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर येताना आम्ही वाघोली या ठिकाणी जेवण केले व त्यानंतर आम्ही नगरच्या दिशेने निघालो. नगर जिल्ह्यातील जातेगाव घाटामध्ये गाडी आली असता आमच्या बाजूने मोटार सायकलवर दोन जण आले. त्यांनी आमच्या गाडीला जोरदार धडक देऊन गाडी थांबवली. गाडीमध्ये असलेली माझी मुलगी रेखा तिचा एकाने फोटो काढला व तो संबंधिताला पाठवला त्यानंतर दुसऱ्याने तिच्यापाशी येऊन तिच्या गळ्याला धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. आम्ही यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये कसेबसे पोहोचलो व या ठिकाणी माझ्या मुलीला मृत घोषित करण्यात आले, असा घटनाक्रम त्यांनी आज न्यायालयासमोर सांगितला.

जी तक्रार नोंदवण्यात आली होती, त्यात अन्य काही गोष्टी होत्या. त्याचा उलगडा सिंधुताई यांनी न्यायालयासमोर केला. पारनेरमध्ये ज्यावेळेला आरोपींना अटक केली, त्यावेळी तेथे तहसीलदारांच्या समोर मी त्या आरोपीला ओळखल्याचेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणासंदर्भामध्ये अन्य काही बाबी त्यांनी न्यायालयासमोर मांडल्या आहेत. माझ्या नातवानेही त्यांना पाहिले आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यायालायत गुरुवारी आरोपी सागर भिंगारदिवे यांच्या वतीने त्याचे वकील यांनी तक्रारदार सिंधुताई यांची उलट तपासणी घेतली. त्यांनी काही प्रश्न त्यांना या घटने संदर्भात विचारले सिंधुताई यांनी जो काही घटनाक्रम आहे तो त्यांना सांगितला व त्यांच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे याने या खटल्याचा विषय संदर्भात न्यायालयामध्ये पत्र देत सदरचा खटला हा मुख्य जिल्हा न्यायाधीशांच्या समोर चालवावा असे पत्र दिले होते. या संदर्भात न्यायालयाने बोठे याच्या वकिलांकडे या अगोदर आपण जिल्हा न्यायालयामध्ये न येता खंडपीठाकडे गेला होता. तुम्हाला स्थानिक पातळीवर मॅटर चालवायचा नाही का असे म्हणत त्यांनी नाराजी यावेळी बोलून दाखवली. जिल्हा व सत्र न्यायाधीश गोसावी यांनी या खटल्याची सुनावणी उद्या 8 डिसेंबर रोजी ठेवली आहे.