अभिप्राय –  रामाणींच्या समग्र कवितेचा आढावा

>> प्रशांत गौतम

गोमंतकीय आणि मराठीतील ज्येष्ठ कवी शंकर रामाणी यांचे जून 2021-22 हे जन्मशताब्दीचे वर्ष होते. या औचित्याने शताब्दी वर्षाच्या अखेरच्या पर्वात गोवा मराठी अकादमीने शंकर रामाणी यांची समग्र कविता असलेला ‘रामाणी’ हा ग्रंथ प्रकाशित केला, ज्याचे संपादन गोवा येथील कवयित्री डॉ.अनुजा जोशी यांनी केले आहे. सदर ग्रंथाला शंभर पानी प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. शंकर रामाणी यांची साहित्य क्षेत्रात झालेली उपेक्षा कमी होण्यासोबत त्यांच्या साहित्याच्या अभ्यासकांना कवितासंग्रह मिळण्याची अडचणही दूर झाली आहे. अनुजा या उत्तम कवयित्री असल्याने रामाणींच्या गूढ, दुर्बोध वाटणाऱया कवितांच्या आशयाचे अंतरंग छान उलगडू शकल्या आहेत. रामाणींचे जीवन चरित्र, त्यांच्या कवितांचे प्रतिमा विश्व, त्यांच्या कवितेतील प्रादेशिकता, प्रेम, आध्यात्मिकता, त्यांची काव्यशैली या सर्व घटकांचा त्यांनी प्रस्तावनेतच प्रदीर्घ आढावा घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शंभर पानी प्रस्तावनेत त्यांनी हा विषय 11 भागांत मांडला आहे. 11 विभागांना उपशीर्षके म्हणून रामाणींच्याच कवितेतील ओळींचा कल्पक वापर करण्यात आला आहे. उदा. प्रतिमाविश्वाच्या विभागाला ‘उन्हाचे आरसे झाले’ आध्यात्मिकतेविषयीचे विवेचन ‘राती उजेडाचे मर्म आकळले’ अशा शीर्षकाचे आहे. लेखनाची भाषा मर्म उकलून दाखवणारी असूनही जड विद्यापीठीय नाही तसेच आस्वादाचे अतिरंजक लालित्यही नाही, हे वैशिष्टय़ सांगता येईल.

दोन कवितांच्या आठवणी येथे सांगितल्या पाहिजेत. रामाणी आणि श्री.पु.भागवत यांचा प्रदीर्घ काळ स्नेह होता. अगदी प्रारंभी रामाणी कविता लिहीत व ‘सत्यकथे’ला पाठवत. श्रीपुंना त्या कविता मिळाल्या की, वाचून अभिप्राय कळवत, न आवडलेल्या कविता साभार परत पाठवत. पाठवलेल्या पत्रात ते सांगत असत…तुमच्या कविता उत्कटतेचा आभास निर्माण करतात, भिडत नाहीत. मात्र त्यांनी एकदा ‘सत्यकथे’ला पाठवलेली एक कविता – ‘अंधारात विराट विश्व विरते’ ही कविता पाठवली. श्रीपुंना ती आवडली. तेव्हापासून रामाणी यांना कवितेचा सूर सापडला. ‘दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले’ या बहुचर्चित कवितेच्या निर्मितीची आठवण डॉ.रमा मराठे आणि डॉ.के.के.आहिरे यांनी सांगितल्याचे अनुजा आपल्या प्रस्तावनेत नमूद करतात. या संग्रहात शंकर रामाणींच्या ‘कातरवेळ’, ‘आभाळवाटा’, ‘पालाण’, ‘दर्पणाचे दीप’, ‘गर्भागार’, ‘सूर्यफुले समाविष्ट आहेत. तसेच ‘ऊर्मिला’ (संगीतिका) यांचा समावेश आहे.

आजच्या काळात साहित्याच्या अभ्यासकांना रामाणींच्या पाच कवितासंग्रहांतील 398 कविता, बालकविता, संगीतिका या समग्र ग्रंथात वाचायला, अभ्यासायला मिळतील. ज्येष्ठ समीक्षक डॉ.वसंत पाटणकर यांचे ‘ब्लर्ब’ (शेवटचे पान) लाभले असून शरद प्रभुदेसाई यांचे मुखपृष्ठ सुंदर आहे.

रामाणी (शंकर रामाणी यांची समग्र कविता)
संपादन : डॉ.अनुजा जोशी
मूल्य : रु. 600 पृष्ठे : 322