सूर-ताल – चाळीस वर्षांची गिटार साधना

>>गणेश आचवल

1984 सालापासून टी सीरिज, टिप्स, विंग्स अशा अनेक नामांकित कॅसेट कंपन्यांसाठी अनेक गाण्यांसाठी गिटारवादक म्हणून कार्यरत असणारे कलावंत म्हणजे ज्ञानेश देव. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये झाले, तर पुढील  शिक्षण आर. ए. पोदार कॉलेजमध्ये झाले.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांना गिटारची आवड निर्माण झाली. गिटारचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी त्यांचे बंधू राजेश देव यांच्याकडून घेतले, तर बॉनी डिकोस्टा आणि शामकांत परांजपे यांच्याकडूनही ते गिटार शिकले. संगीतकार प्रभाकर पंडित, यशवंत देव यांच्यासाठीही त्यांनी गिटारवादन केले.

व्हाइब्राफोन, गिटार, स्पॅनिश गिटार, बेस गिटार, बारा तारी गिटार ही वाद्येदेखील त्यांना येत होती. संगीतकार मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गारवा’ अल्बमसाठीदेखील ज्ञानेश देव यांनी गिटारवादन केले होते. अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’, ‘अमृतलता’ या कार्यक्रमांत ते गिटारवादन, तर ‘मधुरबाला’ या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे.

संगीतकार अनिल अरुण, नंदू होनप, अशोक पत्की, अप्पा वढावकर, उत्तम सिंह, भूपेंद्र सिंह, आशित देसाई, बबलू चक्रवर्ती, वाय. एस. मुल्की, मनोहरी सिंह अशा अनेक मान्यवरांच्या गाण्यांसाठी आणि कार्यक्रमांसाठी ज्ञानेश देव यांनी गिटारवादन केले आहे. सध्याच्या तांत्रिक युगाचा नेमका संगीत क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे हे सांगताना ते म्हणतात, ‘‘पूर्वी अनेक वादक एकत्र येऊन अनेक वाद्यं वाजवत होते व ध्वनिमुद्रण होत होते. त्यामध्ये विचारांची देवाण-घेवाणसुद्धा होत होती. ती गंमत ही तंत्रज्ञानाच्या युगात अनुभवता येणे कमी झाले आहे.’’

ज्ञानेश देव यांना स्वरानंद प्रतिष्ठानचा विजया गदगकर पुरस्कार तसेच स्वरबंध, मुंबईचा सहवादक पुरस्कार लाभला आहे. गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या स्वरातील प्रभू रामचंद्रांचा जो श्लोक आहे त्यात व्हाइब्रापह्न हे वाद्य ज्ञानेश देव यांनी वाजवले आहे. अयोध्येमध्ये सातत्याने हा श्लोक ऐकवला जातो. गेली 40 वर्षे प्रचंड मेहनत करून ज्ञानेश देव यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.