साताऱयात प्रचंड गारपीट

जिह्याला आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सातारा शहरासह कराड, कोरेगाव, वाई, जावली, फलटण आदी तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱयासह पावसाने दणका दिला. अनेक ठिकाणी प्रचंड गारपीटही झाली. वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेचे आणखीनच हाल झाले.

आजही सकाळपासून उन्हाचे चटके बसत होते. जिह्याच्या पूर्वेकडील माण, खटाव, फलटण तालुक्यांमध्ये आगडोंब उसळल्यासारखे चित्र झाले आहे. अशात दुपारी तीननंतर विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱयासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सातारा शहरासह कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर परिसराला सायंकाळी पावसाने झोडपून काढले. वाऱयामुळे रहिमतपूर येथे महाबळेश्वर-विटा मार्गावर निवडणुकीसाठी उभारलेला स्थिर सर्वेक्षण पथकाचा मंडप कोसळला. पावसावेळी गारांचाही वर्षाव झाला.

जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात दीड तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. जावलीतील मेढा, कुसुंबी, केळघर परिसरातही पाऊस झाला. कराड तालुक्यातील मसूर येथे पंढरपूर मार्गावरील एक झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळनंतर फलटण तालुक्यातही पावसाला सुरुवात झाल्याचे वृत्त होते. दरम्यान, वादळी पावसामुळे जिह्यात बऱयाच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जीवघेण्या उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेची अक्षरशः उलघाल झाली.