विम्याचे दीड कोटी लाटण्यासाठी स्वत:च्याच अपघाताचा बनाव; आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

विम्याचे दीड कोटी लाटण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव करणाऱया आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयान फेटाळून लावला.

अपघाताचा बनाव करण्यासाठी आरोपीने शेजारच्याची हत्या केली. शांत डोक्याने कट रचून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपी सुमीत मोरेला जामीन देता येणार नाही, असे न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.  सातारा येथील न्यायालयाने मोरेविरोधातील खटला 15 महिन्यांत संपवावा. 15 महिन्यांत खटला पूर्ण झाला नाही तर मोरे जामिनासाठी नव्याने याचिका करू शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले.

पैशासाठी हत्या 

मोरेने दीड कोटीचा विमा काढला होता. या पैशांसाठी मोरे व त्याच्या कुटुंबीयांनी कार अपघाताचा बनाव केला. या अपघातात मोरेचे निधन झाल्याचे भासवले. कार अपघातात भाजलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. काही दिवसांनी मोरे काही नागरिकांना दिसला. मोरेने विम्याच्या पैशांसाठी शेजारच्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी मोरेला अटक केली.