world-cup-2023- IND vs ENG टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली; विजयासाठी इंग्लंडला 230 धावांचे आव्हान

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 29व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या विश्वचषकात इंग्लंडने जरी आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघाने आज टीम इंडियाविरोधात दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे त्यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीची घोडदौड रोखली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

कर्णधार रोहितने या सामन्यात पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याचे शतक अवघ्या 13 धावांनी हुकले. वर्ल्ड कप स्पर्धेत एका फॉरमेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहितने 398(2023) धावांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सौरव गांगुलीने 2003 मध्ये 465 धावा, विराट कोहलीने 2019मध्ये 443धावा केल्या होत्या. रोहितने आज मोहम्मद अझरुद्दीनचा 1992 सालचा 332 धावांचा विक्रम मोडला. कपिल देव यांनी 1983 मध्ये 303 धावा केल्या होत्या.

भारताला चौथ्या षटकात ख्रिस वोक्सने धक्का दिला आणि अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( 9) त्रिफळा उडवला. विराट कोहलीही शून्यावर डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन परतला. रोहित शर्माने संयमी खेळ केला होता, परंतु श्रेयस अय्यर (4) पुन्हा अपयशी ठरला. वोक्सच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो मिड ऑनला मार्क वूडच्या हाती सहज झेल देऊन परतला. रोहितने 66 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावांचा टप्पाही ओलांडला. त्यानंतर रोहित व लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना फटकेबाजी केली. 111 चेंडूंत 91 धावांची भागीदारी 31व्या षटकात विलीने संपुष्टात आणली. लोकेश 58 चेंडूंत 38 धावांवर झेलबाद झाला. रोहितसह सूर्यकुमार यादवने 33 धावांची भागीदारी केली होती आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने अनुभवी गोलंदाज आदील राशीदला बोलावले. त्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारही झेलबाद झाला. त्याचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. त्यानंतर आलेल्या फलंदाजानीही फारशी चांगली कमगिरी केली नाही. टीम इंडियाचा डाव 229 धावांवर आटोपला आहे. आता इंग्लंडला विजयासाठी 230 धावा करायच्या आहेत.