पत्नीसह चौघांचा खून; आरोपीस फाशीची शिक्षा

चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढून यंत्रमागाच्या लाकडी माऱयाने पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा खून केल्याप्रकरणी कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रदीप विश्वनाथ जगताप (वय 40) याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात आरोपीच्या मुलीसह 24 जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

खुनाची ही घटना शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे ऑक्टोबर 2018 मध्ये घडली होती.

पार्वती औद्योगिक वसाहत (यड्राव) येथे आरोपी प्रदीप जगताप याने पत्नी रूपाली जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण काढले होते. यावेळी यंत्रमागाच्या लाकडी माऱयाने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित आयरेकर यांच्यावर हल्ला केला होता. यात तिघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या खून प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांची तपासणी सरकारी वकील ऍड. विद्याधर सरदेसाई यांनी केली. यात बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी ही प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने तिची साक्ष निकालात महत्त्वाची ठरली. दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद ऐकून ही घटना दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

ऍड. यू. एम. कुलकर्णी, शहापूर पोलीस ठाण्याचे सतीश कांबळे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे हनुमंत बंडगर यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेतले.