कबड्डीच्या रणसंग्रामासाठी सजतेय वाडिया पार्क; देशभरातून 32 कबड्डी संघांचा दम घुमणार

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात नगर जिह्याला प्रथमच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपद लाभले असून येत्या 21 ते 24 मार्चदरम्यान रंगणाऱया या स्पर्धेचे आयोजन अभूतपूर्व आणि दिमाखदारपणे करण्यासाठी नगर हौशी कबड्डी संघटना सज्ज झाली आहे. तब्बल 15 हजार कबड्डीप्रेमींच्या साक्षीने 4 क्रीडांगणात कबड्डीचा हा रणसंग्राम खेळविला जाणार असल्यामुळे वाडिया पार्क नववधूप्रमाणे सजवले जात आहे.

गतवर्षी हरयाणा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे जेतेपद थोडक्यात हुकले होते. ते जेतेपद जिंकण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्र संघाने पंबर कसली आहे, तशीच मेहनत नगर जिल्हा कबड्डी संघटनेने घेतली आहे. 70 व्या पुरुष गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू, पंच, अधिकाऱयांच्या निवास आणि भोजनाच्या व्यवस्थेबरोबर त्यांच्या प्रवासाचीही जबरदस्त व्यवस्था संघटनेने केली आहे. विशेष करून स्पर्धेच्या निमित्ताने वाडिया पाका&त अवघं हिंदुस्थानच अवतरणार असल्यामुळे त्यांना दररोज विविध पद्धतीचे शाकाहारी-मांसाहारी चविष्ट भोजनाची सोय करण्यात आली आहे. एकाही खेळाडूची तसेच संघटकाची गैरसोय होऊ नये म्हणून आयोजकांनी आपल्या कार्यकर्त्यांची सदैव तत्पर असलेली फळीच उभारली आहे.

कबड्डीप्रेमींसाठी सुखद धक्का

नगर जिह्यात प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा होत असल्यामुळे प्रेक्षक मोठय़ा संख्यने वाडिया पार्क गाठणार, हे निश्चित आहे. त्यामुळे तब्बल 15 हजार प्रेक्षक कबड्डीचा मनमुराद आनंद घेतील, अशी भव्य गॅलरी चार मॅट क्रीडांगणाच्या आसपास उभारण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे सरचिटणीस शशिकांत गाडे यांनी दिली. एवढेच नव्हे तर किमान पाच हजार बाईक आणि 500 वाहनांच्या पार्पिंगचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

32 संघ आणि 8 गट

या स्पर्धेत यंदाही 32 संघांचाच सहभाग निश्चित आहे. त्यामुळे 4 संघांचे 8 गट पाडले जाणार असून प्रत्येक गटाचा विजेता उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. महाराष्ट्रासह गतविजेता रेल्वे, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि गोव्यासारख्या संघांनीही जोरदार तयारी केली आहे. स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत यजमान महाराष्ट्राचे नाव सर्वात वर असून रेल्वे, हरयाणा आणि गोव्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. या स्पर्धेत प्रो कबड्डीत खेळलेले किमान दीडशेपेक्षा अधिक स्टार खेळाडू आपला भन्नाट खेळ दाखवतील, असा विश्वास आयोजन समितीच्या गाडे यांनी व्यक्त केला आहे.

 

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ ः महाराष्ट्र, ओडिशा, गोवा, झारखंड, गुजरात, केरळ, पुद्दुचेरी, आसाम, उत्तराखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचल प्रदेश, चंदिगड, . बंगाल, जम्मू आणि कश्मीर, बिहार, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, हरयाणा, सेनादल, रेल्वे, त्रिपुरा, विदर्भ, मध्य प्रदेश, मणिपूर, पंजाब, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, बीएसएनएल.