मराठा आरक्षणासाठी किशोर जावळे यांचे उपोषण; बीपी वाढला उपचार घेण्यास नकार

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून किशोर जावळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणादरम्यान रविवारी त्यांचा बीपी अचानक वाढला. मात्र, जावळे यांनी आरोग्य सेवा आणि उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची धांदल उडाली. रात्री कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, शेख, गवसने, पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुपे ,जाधव दुपारी 3 वाजता व रात्री 9 वाजता उपोषणकर्त्यांना उपचार घ्यावा, म्हणून विनंती केली. मात्र, उपोषणावर ठाम राहत त्यांनी उपचाराला नकार दिला. मात्र, यामळे प्रशासनाची धांदल उडाली.

संध्याकाळी 8 वाजता उपोषणाच्या समर्थनार्थ गावातील तरुणांनी पत्रकार पी. डी. आहेर , कर्ना जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅण्डल मार्च काढला. हजारो तरुणांनी या कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होत सरकारचा निषेध नोंदवला. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घोषणाबाजी केली. उपोषणस्थळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मधुकर साबळे, अजित काळे, सुधाकर परजणे, सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थांनी भेट देत जावळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जोपर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे तोपर्यंत सोनेवाडीत त्यांना पाठिंबा म्हणून उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते किशोर जावळे यांनी सांगितले.