सभा चिखलीकरांची, गुणगान डीलरचे! फडणवीसांची जुमलेबाजी पाहून नांदेडकर थक्क, भाजपला कट मारून मिंधे हिंगोलीला पळाले

Lok Sabha Election 2024 – गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांची जीभ थकत नव्हती…या निवडणुकीत घड्याळाचे काटे फिरले अन् ‘आदर्श डीलर’चे कौतुक करता करता अक्षरश: फडणवीसांच्या तोंडाला फेस आला. फडणविसांची ही जुमलेबाजी पाहून नांदेडकर थक्क झाले! तर हिंगोलीत उमेदवार बदलण्यास भाग पाडले म्हणून नांदेडात भाजपला कट मारून मुख्यमंत्री मिंधे हिंगोलीला पळाले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चिखलीकरांनी काढलेल्या मिरवणुकीवर शिंदे गटाने बहिष्कार टाकला. शिंदे गटाचे बहुतेक कार्यकर्ते वाशीम मतदारसंघात राजश्री पाटील यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांता पाटील यावेळी उपस्थित होते.

‘डीलर’च्या हा लीडर नाही, हा तर डीलर
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘आदर्श’, मनी लाँड्रिग घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांवर आरोपांची सरबत्ती केली होती. हा कसला लीडर, हा तर डीलर आहे, असेही ते म्हणाले होते. अशोक चव्हाण भाजपच्या वॉशिंगमध्ये गेले. मोदी वॉशिंग पावडरने त्यांच्यावरील घोटाळ्यांचे डाग धुवून निघाले. आज त्याच ‘डीलर’च्या मांडीला मांडी लावून फडणवीस बसले आणि याच ‘डीलर’चे गुणगान करताना फडणविसांना पाहून हेच का ते, असा प्रश्न नांदेडकरांना पडला. कोणताही डाग नसलेले अशोक चव्हाण आमच्या सोबत आले असून, आमची ताकद वाढल्याचा दावाही फडणविसांनी केला.

चिखलीकरांच्या सभेकडे मिंध्यांची पाठ
भाजपने केलेल्या प्रचंड विरोधामुळे मिंध्यांना हिंगोलीतील उमेदवार बदलावा लागला. लावणीफेम हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची सपत्नीक रवानगी थेट यवतमाळ-वाशीम मतदारसंघात करण्यात आली. भाजपमुळेच ही नामुष्की ओढावल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडात प्रताप पाटील चिखलीकरांच्या जाहीर सभेकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता नांदेड विमानतळावर आले आणि तडक हिंगोलीकडे निघून गेले.