भाजप दीडशे पारही जाणार नाही; राहुल गांधींचा हल्ला

15 ते 20 दिवसांपूर्वी वाटत होते की भारतीय जनता पार्टी 180 जागांवर विजय मिळवेल. पण आता वाटतेय की, भाजपा 150 पारही जाणार नाही. प्रत्येक राज्यात, जिह्यांत गावोगावी आम्हाला रिपोर्ट मिळत आहे की, भाजपाविरोधात सुप्त लाट आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इंडिया आघाडीचा प्रचार जोरदार सुरू असून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत असलेली आघाडी एक मजबूत आघाडी असून उत्तम रिजल्ट मिळेल असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढलेली असताना भाजपा जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी कधी समुद्राच्या पाण्यात डुबकी मारतात तर कधी सी प्लेनमध्ये बसतात, जगभरात फिरतात. परंतु महत्त्वाच्या विषयांवर बोलत नाहीत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. गरिबी एका झटक्यात संपवण्याचा दावा एक नेता करत आहे, असा आरोप मोदी यांनी तुमच्यावर केला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता गरिबी एका झटक्यात संपवण्याचे आम्ही कुणीही बोललेलो नाही. पण आमच्याकडे एक फॉर्म्युला आहे ज्यामुळे गरिबी आणि समाजात असलेली असमानता कमी होऊ शकते, असे राहुल गांधी म्हणाले.

दोन विचारांची लढाई

आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांची लढाई आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आल्याचे राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील प्रचारसभेत सांगितले. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ते सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, मजुरांचे आणि व्यापाऱ्यांचे सरकार असेल, असे राहुल गांधी म्हणाले. भाजपा सरकार केवळ 22 ते 25 श्रीमंत लोकांचे आहे. भाजपप्रणीत सरकार हप्ताबाजी करते. इलेक्ट्रोरल बॉण्ड योजना हे जगातील सर्वात मोठे खंडणीचे रॅकेट आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन

संपूर्ण देशाला माहीत आहे, पंतप्रघान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत आणि इलेक्टोरल बॉण्ड हे जगातील सर्वात मोठे खंडणीचे रॅकेट आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. काही दिवस आधी पंतप्रधानांनी एका वृत्तसंस्थेला एक भलीमोठी मुलाखत दिली. ही मुलाखत स्क्रिप्टेड होती. परंतु फ्लॉप शो होता. मोदी म्हणाले की, इलेक्टोरल बॉण्ड योजना ही पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आली. स्वच्छ राजकारण करण्यासाठी आणण्यात आली. जर ही गोष्ट खरी असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ही योजना का रद्द केली, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला. इलेक्टोरल बॉण्ड ही योजना जगातील सर्वात मोठा घोटाळा असून हिंदुस्थानातील सर्वच्या सर्व उद्योजक ही गोष्ट जाणतात. मोदी यांनी या प्रकरणी कितीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी आता काहीच उपयोग नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.