महाविद्यालय राजकीय प्रचाराचे मैदान नाही

युवासेनेच्या शिष्टमंडळाने ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन दिले. यावेळी प्राचार्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाने याप्रकरणी खुलासा केल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी सिनेट सदस्य शशिकांत झोरे, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्पे, युवासेना विस्तारक सुयश घाडी, विभाग अधिकारी विजय रांजणे उपस्थित होते.

महाविद्यालये राजकीय प्रचाराचे मैदान नाही. त्यामुळे नवमतदार नोंदणी तसेच नवमतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांचा सहभाग असता कामा नये, असा इशारा मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविद्यालयाचा वापर होणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात आयोजित सभेत भाजपचे लोकसभेचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या निवडणूक प्रचारासाठी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बसविण्यात आले होते. दुसऱया दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा असूनही त्यांचे ओळखपत्र जप्त करून त्यांच्यावर पीयूष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव यांच्या सभेला हजेरी लावण्याची सक्ती केली होती. हा प्रकार उजेडात आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने याचा कडाडून विरोध केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील देशात लोकशाही राहावी, अशी दिल्लीश्वरांची इच्छा नाही, असे ट्विट करीत विद्यार्थ्यांवरील बळजबरीचा निषेध केला होता.

तसेच युवासेना माजी सिनेट सदस्यांनी कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुळकर्णी यांना निवेदन मेल करून संबंधित महाविद्यालयावर कारवाईची मागणी माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, किसन सावंत, स्नेहा गवळी आणि शिवसेना उपनेत्या शीतल शेठ देवरुखकर यांनी केली. याची दखल घेत विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांसाठी सूचना जारी केल्या असून & आचारसंहितेचे पालन करण्यास सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी ठाकूर महाविद्यालयावर कारवाईसंदर्भात युवासेना माजी सिनेट सदस्य लवकरच कुलगुरूंची भेट घेणार आहेत.

तीन दिवसांत खुलासा करा

ठाकूर महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार होत असल्याच्या युवासेनेच्या तक्रारीची दखल घेत मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तीन दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या सभेविरुद्ध भर सभागृहात आवाज उठवला त्यांच्यावर कारवाई न करण्याची मागणी युवासेना माजी सिनेट सदस्यांनी केली असता कुलगुरूंनी त्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार नाही असे आश्वासन दिले.