लडाखवासीयांनी विचारपूर्वक मताधिकार वापरावा, सोनम वांगचूक यांचे आवाहन

लडाखच्या जनतेने या वेळी देशहित लक्षात घेऊन अत्यंत विचारपूर्वक मताधिकाराचा वापर करावा, असे आवाहन येथील पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी केले आहे. लडाखवासीयांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असे आवाहन त्यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक्सवरून एका व्हिडीओद्वारे केले.

लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि घटनेच्या सहाव्या परिशिष्टात अंतर्भाव यासाठी वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली गेले 21 दिवस बेमुदत उपोषण सुरू होते. केवळ मीठ आणि पाण्यावर राहिल्यामुळे अत्यंत कृश झालेल्या वांगचूक यांनी आज उपोषण सोडले. ‘मी लडाखसाठी घटनात्मक संरक्षण आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढत राहीन,’ असे वांगचूक यांनी उपोषण सोडताना जाहीर केले. दरम्यान, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांना केवळ राजकारणी म्हणायचे नाही. आम्ही त्यांना राजनीतीज्ञही म्हणू पण, त्यासाठी त्यांनी आधी आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा सच्चेपणा  दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.