महाड MIDC मधील कंपनीत आगीचा भडका; एकामागोमाग 6 स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

महाड एमआयडीसीमधील एस्टेक लाईफसायन्सेस कंपनीला बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली आणि एकामागोमाग एक 6 स्फोट झाले. यामुळे एकच खळबळ उडाली. आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने सर्व कर्मचारी सुखरुप असून जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅस्टेक कंपनीच्या ऍडिशनल एमआयडीसी मधील k2 डीडीएल प्लांटला बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. आग लागली तेव्हा कंपनीमध्ये जवळपास 25 कर्मचारी काम करत होते. आगीमुळे कंपनीत एकामागोमाग एक 6 स्फोट झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीची माहिती मिळताच महाड एमआयडीसी फायर स्टेशन, लक्ष्मी ऑर्गनिक, प्रिव्ही ऑरगॅनिक आणि नगर परिषदेची फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.