मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा – मिंध्यांना मिळणार ठेंगा; अजित पवार गटाला गिफ्ट, राजकीय वर्तुळात चर्चा

ajit-pawar-eknath-shinde

राज्याचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चांना सुरुवात झाल्यावर तिन्ही गॉातील नाराजी धुसफूस उघड होत आहे. त्यातच अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यापासून मिंधे गटाची गोची झाली आहे. अनेकजण मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, सातत्याने त्यांच्या पदरी निराशच येत आहे. आताही मंत्रीमंडळ विस्तारात मिंध्यांना ठेंगा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्री पद वाट्याला येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील अजित पवार गटाला नववर्षात मोठे गिफ्ट मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राज्याचा तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल. या विस्तारामध्ये राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदे म्हणजे एक कॅबीनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांचे नव वर्ष आनंदात सुरू होणार असल्याच्या चर्चा म्हटलं जातय.

राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. त्यातच अजित पवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नाराजी नाट्यानंतर अजित पवारांनी तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मिंधे गटाला यावेळीही ठेंगाच मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजतं घोंगडं असल्याचं चित्र होतं. पण अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतला आणि वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा हा मार्गी लागला. पण या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील अनेक आमदार घोड्यावर बसून होते. पण ती मंत्रीपदं राष्ट्रवादीकडे गेलीत. त्यामुळे मिंधे गटात नाराजी पसरली होती. आता तिसऱ्या टप्प्यातही मिंध्यांची निराशा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे.