मिंधे गटातील धुसफूस पुन्हा उघड; आमदारांची स्वतःच्याच मंत्र्याविरोधात तक्रार

राज्यातील ट्रिपल इंजिीनच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्यात येते. मात्र, त्यांच्यातील धुसफूस, नाराजी सातत्याने उघड होत असते. आता मिंधे गटातील नाराजी आणि धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मिंधे गटातील आमदारांनीच त्यांच्या गटातील मंत्र्याविरोधात तक्रार केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काही आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची तक्रार करत कामे होत नसल्याचे म्हटले आहे. ही तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मंत्र्यांना वारंवार सांगूनही कामे होत नसल्याच्या तक्रारी मिंधे गटाच्या आमदारांनी केल्या आहेत. त्यामुळे आमदारांची मर्जी आणि गटाची प्रतिमा सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री काय कारवाई करणार,यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी अनेकदा उघड झाली आहे. मात्र पहिल्यांदाच शिंदे गटातील 15 ते 20 आमदारांनी दोन ते तीन मंत्र्यांची तक्रार केली आहे. आमदारांनी सहा महिन्यांचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. अनेक आमदार नेमक्या कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांवर नाराज आहेत त्या आमदारांची नावे अद्याप समजलेली नाहीत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी रस्सीखेच आणि नाराजीनाट्य बघायला मिळणार आहे.

तानाजी सावंत यांच्याविरोधात गटाची नाराजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तानाजी सावंतांविषयी सत्ताधारी काय भूमिका घेणार, याची चर्चा होत आहे. तसेच संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेणार याची चर्चा होत आहे. मंत्री आमदारांची कामे करणार नसतील तर मंत्री बदला अशी मागणी आमदारांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करणार का आणि कारवाई केली तर कोणाचे मंत्रीपद जाणार आणि कोणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार, याच्या चर्चा जोर धरत आहे. मात्र, दरवेळीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्यावर नाराजी नाट्य घडते. राज्यात पुन्हा एकदा असेच नाट्य बघायला मिळण्याची शक्यता आहे.