आता खरा पिक्चर सुरू होईल, नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचे महत्त्वाचे विधान

यंदाचे हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसापासून जबरदस्त वादळी ठरत आहे. नवाब मलिक यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. नवाब मलिक हे गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यावर महायुती सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अजित पवार यांना नवाब मलिक आपल्यासह नकोत, असे पत्रही लिहिले. त्यावर अजित पवार यांनीही या पत्राचे काय करायचे आणि काय भूमिका घ्यायची, हे मी पाहतो असे म्हटले आहे. आता या सगळ्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची आहे असे बच्चू कडू म्हणाले आहेत. या मुद्द्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रियाही दिली आहे.

अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या दोघांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. नवाब मलिक म्हणाले की, मला अजित पवारांसह राहायचे आहे आणि अजित पवार म्हणाले की, नाही घेत त्यांना, तर खरा पिक्चर सुरु होईल. त्या त्या पक्षाची धोरणे सांभाळायचा हा मुद्दा आहे. नवाब मलिकचा विषय फडणवीस यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. मी त्यांच्या मनातले कसे काय सांगणार, असेही बच्चू कडू म्हणाले. कडू यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावरून तर्कवितर्कांना उधाण आले असताना अजित पवारांनी नवाब मलिकांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. मलिक यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे पत्र मला मिळाले आहे. मी ते वाचलं आहे. त्याचे काय करायचे आणि काय भूमिका घ्यायची, ते मी बघेन असेही अजित पवार म्हणाले. त्यावर बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.