आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तोकडी, मदतीत वाढ करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी एक लाख रुपये मदतीची रक्कम अत्यंत तोकडी असून त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पाच लाख रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. शासनानेही लेखी उत्तरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी दिली आहे.राज्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.