अजित पवारांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का?… सुषमा अंधारेंचा फडणवीसांना रोखठोक सवाल

सध्या जामिनावर असलेले नवाब मलिक अजित पवार गटासोबत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना सोबत घेण्यास विरोध केला. राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्या पत्रानंतर खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या पत्राबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच रोखठोक सवाल केला आहे. सत्तेपेक्षा देश मोठा असे जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

नवाब मलिक यांच्या अजित पवार गटासोबत येण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र अजित पवारांना लिहिले आहे. त्यात त्यांनी अशा पद्धतीने नवाब मलिक त्यांना सोबत घेऊ नये असे म्हटले आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असेही म्हणत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, सत्तेपेक्षा देश मोठा असे जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपने आरोप केले, त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेक कुठे गेला होता, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

देवेंद्रजी आपण ज्या अजित पवारांना पत्र लिहीत आहात, त्याच अजित पवारांवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्राधन नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजित पवारांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल एवढा प्रश्न आहे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.