फडणवीस, चिल्लर चाळे करू नका…मराठ्यांच्या नाराजीचा आगडोंब उसळेल! मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा समाजाच्या तरुणांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. माझेही व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चिल्लर चाळे थांबवावेत, अन्यथा मराठ्यांच्या नाराजीचा आगडोंब उसळेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आरक्षणविरोधी धोरणावर कडाडून हल्लाबोल केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाशी द्वेषभावनेने वागत आहेत. मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे चिल्लर चाळे फडणविसांनी तात्काळ थांबवावेत, नसता त्यांना मराठ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना आचारसंहिता लावणे हा अन्याय आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाची मागणी थंड्या बस्त्यात ठेवण्यात आली आहे आणि याचा फटका फडणवीस यांना बसल्याशिवाय राहणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

मला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे, पण मला हात लावाल तर तुमच्या 62 आमदारांच्या भ्रष्टाचाराची कुंडली माझ्याकडे आहे, असा इशारा देतानाच राजकारण हा माझा मार्ग नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले. निवडणुकीत मतदान कुणाला करायचे हे मराठा समाजाने ठरवावे, असेही ते म्हणाले.

एसआयटीचा अहवाल मला माहिती आहे

मराठा आरक्षण आंदोलनाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीचा अहवाल काय आहे हे मला माहिती आहे. मला अडकवण्यासाठी हा अहवाल अगोदरच तयार करण्यात आला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. अहवाल तयार आहे तर मग चौकशीला काय कॅनडातून पोलीस बोलावणार आहात का, असा टोलाही त्यांनी लगावला.