आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक; समृध्दी महामार्ग रोखला

जालना येथील अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. विविध प्रकारे ते सरकारविरोधातील रोष व्यक्त करत आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील बदनापूरजवळील खादगाव येथील मराठा आंदोलकांनी एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा गगनभेदी घोषणा देत समृध्दी महामार्गावर टायर जाळत रास्ता रोको करत समृद्धी महामार्ग रोखला.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सकल मराठा समाज खादगाव येथील नागरिकांनी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास समृध्दी महामार्गावर येत रास्ता रोको केला. यावेळी खादगाव येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून आपल्या आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी समृध्दी महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी नायब तहसिलदारांसह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी समृध्दी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.