प्रॉमिसिंग; ध्यास अभिनयाचा

>> गणेश आचवल

झी मराठीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने गेल्या वर्षभरात खूप लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील ‘अप्पी’ ही मध्यवर्ती भूमिका करणारी अभिनेत्री शिवानी नाईक…एक प्रॉमिसिंग चेहरा.

शिवानीचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. तिची बहीण बालनाटय़ात काम करायची. शिवानी अगदी लहान असतानाची गोष्ट. ती तिच्या ताईबरोबर बालनाटय़ाची तालीम पाहायला गेली होती. तिथे एका बालनाटय़ात एक अगदी छोटीशी भूमिका होती. ताईने विचारल्यावर शिवानीने होकार दिला आणि पहिलीमध्ये शिकणारी शिवानी रंगभूमीवर आली.

शिवानी म्हणते, ‘‘माझे पाठांतर खूप चांगले असल्याने माझे सर्वजण काwतुक करू लागले. एका संस्थेतर्फे राज्य नाटय़ स्पर्धेसाठी बालकलाकार म्हणून मी ‘ब्लॅक’ नावाच्या नाटकात काम केले. त्याचे काही प्रयोग विविध ठिकाणी झाले. माझे काwतुक झाले. मी दहावीमध्ये असताना आमच्या शाळेतर्फे राज्य नाटय़ स्पर्धेत भाग घेण्याचे ठरले. दहावीची परीक्षा एका महिन्यावर आली होती. शाळेतील शिक्षक-शिक्षिका माझ्या घरी माझ्या पालकांची परवानगी घेण्यासाठी आले. घरून परवानगी मिळाली, पण अभ्यास मागे पडता कामा नये अशा अटीवर. त्या नाटकाचे नाव होते ‘चिमणीची गोष्ट.’ आमच्या नाटकाला आणि मलासुद्धा या नाटकातील माझ्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले.’’ दहावीनंतर शिवानीने सरस्वती भुवन कॉलेजमध्ये कॉमर्सला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानादेखील बाहेरील काही नाटय़ संस्थांतून शिवानी नाटकांत काम करू लागली. नाटय़वाडा या संस्थेतर्फे सादर झालेली ‘मॅट्रिक’ ही एकांकिका महाराष्ट्रभर गाजली होती. ‘सवाई’ एकांकिकेचा बहुमान आणि इतर अनेक सन्मान या एकांकिकेला मिळाले होते. शिवानीला अनेक स्पर्धांतून या एकांकिकेसाठी पुरस्कार मिळाले होते. एकांकिका स्पर्धांतून नाटय़प्रेमी मंडळींचा ग्रुप जमला आणि मग ‘नाटय़मल्हार’ नावाच्या ग्रुपतर्फेदेखील अनेक एकांकिका आणि नाटकांत शिवानी काम करू लागली होती. नगर करंडक एकांकिका स्पर्धा हा तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. शिवानी सांगते, ‘‘आम्ही ‘अय’ नामक एकांकिका सादर केली. बोलता न येणाऱया मुलीची माझी भूमिका होती. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अद्वैत दादरकर आणि श्वेता शिंदे हे परीक्षक होते. एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार मिळाला. मलादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तेव्हा श्वेता शिंदे यांनी मला सांगितले की, ‘‘सध्या कुठे काही काम घेऊ नकोस, आपण एक प्रोजेक्ट करणार आहोत.’’ तीन महिन्यांनंतर मला पह्न आला आणि मी ऑडिशनसाठी मुंबईला आले. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील शीर्षक भूमिका मला मिळाली होती.’’

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही शिवानीची पहिली मालिका. मालिका विश्वात तिने पदार्पण केले आणि अवघ्या काही दिवसांतच तिची भूमिका सर्वांनाच आवडू लागली. शिवानी म्हणते, या मालिकेत अप्पीचा संपूर्ण जीवनप्रवास आहे. तिचे कलेक्टर होण्याचे ध्येय गाठल्यानंतरच्या तिच्या जीवनातील अनेक टप्पे यात मांडले आहेत. अप्पीच्या आयुष्याचा संपूर्ण आलेख यात दाखवला आहे. या मालिकेने मला ओळख दिली आहे आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाददेखील मिळत आहे. एकांकिका स्पर्धेने शिवानीच्या आयुष्यात टार्ंनग पॉइंट आणला आणि पदार्पणातच तिला एक वेगळी ओळख मिळाली.