डिझास्टर मॅनेजमेंटमधील 58 पैकी 46 हॉटलाइन बंद; पालिकेच्या आपत्कालीन विभागावरच आपत्ती

>>देवेंद्र भगत

मुंबईत कोणत्याही आपत्कालीन स्थितीत धावून येणाऱया महापालिकेच्या महत्त्वाच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागातील 58पैकी तब्बल 46 हॉटलाईन नंबर बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर संपर्क व्यवस्था ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे ‘1916’ या क्रमांकावरील ‘हॉटलाईन’ पह्न सेवा तातडीने सुरू करावी यासाठी पालिका प्रशासनाने ही सेवा देणाऱया ‘एमटीएनएल’ला पत्र दिले आहे.

पालिकेच्या आपत्कालीन विभागावर संपूर्ण मुंबईतील आपत्कालीन संपर्क, मदत यंत्रणा समन्वय व्यवस्थेची जबाबदारी असते. यासाठी आपत्कालीन विभागाने जाहीर केलेल्या ‘1916’ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना  24 तास संपर्क साधण्याची व्यवस्था असते. त्यामुळे आग, अतिवृष्टी, इमारत कोसळणे, जमीन खचणे, पूर अशा प्रकारचे कॉल इथे आल्यानंतर कार्यवाही, बचावकार्य करण्यासाठी मदत होते. यासाठी आपत्कालीन विभागात सुमारे 58 हॉटलाईनची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी 50 ते 60 कर्मचारी अहोरात्र काम करीत असतात. मात्र सद्यस्थितीत  46 हॉटलाईन बंद असल्याने गैरसोय होत आहे.

सुदैवाने निवडणूक डय़ुटी टळली

आपत्कालीन विभागातील 60 कर्मचाऱयांपैकी तब्बल 50 कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र पालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेत इतके कर्मचारी निवडणूक डय़ुटीला पाठविल्यास आपत्कालीन विभाग ठप्प पडण्याची भीती व्यक्त केल्याने सुदैवाने ही डय़ुटी टळली आहे.

 पावसाळय़ात फटका

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून कमी वेळात विक्रमी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी ‘1916’ या क्रमांकाचा खूप फायदा होतो. कोरोना काळातही याच नंबरवर बेड, अॅम्ब्युलन्स, जेवण अशा सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या होत्या. त्यामुळे या क्रमांकावरील सर्व हॉटलाईन सुरू होणे अनिवार्य आहे.