नीलेश लंके मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, बाळासाहेब थोरात यांचा विश्‍वास

नीलेश लंके यांचा दांडगा जनसंपर्क असून लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे. मतदारसंघाचा आढावा घेतला असता ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचे चित्र असून गरीबाच्या पोराला लोकसभेत पाठविण्याचा विडाच जनतेने उचलला आहे. लंके हे या निवडणूकीत मोठया मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्‍वास माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

थोरात हे श्रीगोंदे येथे घनश्याम शेलार यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. श्रीगोंद्याहून पुन्हा संगमनेरकडे परतताना ते नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयात थांबले होते. त्यापूर्वी पारनेर शहरात आल्यानंतर त्यांनी विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची लोकसभा निवडणूकीसंदर्भात भेट घेतली.

उपस्थितांशी अनौपचारीक गप्पा मारताना थोरात म्हणाले, सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळण्याचा लंके यांचा स्वभाव असल्यामुळे जनतेला त्यांचा स्वभाव भावतो. व्यक्ती कोणतीही असो त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांनी काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेस त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. लंके हे सर्वसाधारण कुटुंबातील असल्याने त्यांना मताच्या दानाबरोबरच मदतही दिली जात आहे हे महत्त्वाचे आहे. लोकांचा प्रतिसाद, ते देऊ करत असलेली आर्थिक मदत हे पाहता ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याचे थोरात यांनी सांगितले. लंके यांनी कोरोना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो कोरोना बाधितांना उपचार दिले. कोरोना बाधिताजवळ जाण्यास कोणी धजावत नसताना लंके हे रूग्णांमध्येच झोपून त्यांची सेवा करण्यात व्यस्त असल्याचे नागरीकांनी दुरचित्रवाणीवरून अनेकदा त्यांचा हा सेवाभावही मतदारसंघातील जनतेला भावला असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

औटी यांच्याशी सकारात्मक चर्चा

विधानसभचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत असून महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून ते महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यासोबत असतील असे थोरात यांनी सांगितले. योग्य वेळी ते प्रचारात सक्रीय होतील असे सांगतानाच बैठकीतील चर्चेचा तपशील मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवला.