केरळचे मुख्यमंत्री ‘टग्या’ आहेत; अनेक खुनांमध्ये हात असल्याचा राज्यपालांचा आरोप

केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद नवा नाही.मात्र, या दोन पदातील संघर्ष आरोप-प्रत्यारोप होतच असतात. नुकताच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. त्यामुळे या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले गेले आहे. विजयन यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीच्या घटनेनंतर आता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्र्यांना थेट टग्या म्हटले आहे. तसेच त्यांचा कन्नुर येथील अनेक खुनांमध्ये हात असल्याचा खळबळजनक दावा केला. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर केरळमधील राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष अधिक उफाळण्याची शक्यता आहे.

राज्यपालांनी कोझीकोड शहरातील गजबजलेल्या एस.एम. रस्त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी एसएफआयने त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांनी एसएफआयचा अनेकदा गुंड असा उल्लेख केल्याने या संघटनेने संताप व्यक्त करत राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपालांनी संघटनेच्या विरोधला न जुमानता पोलीस संरक्षण नाकारत या गजबजलेल्या रस्त्यावर उतरले होते.

परीक्षा देत परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच रस्त्यावरील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेतेही उपस्थित होते. राज्यपालांनी एसएफआयचा अनेकदा गुंड असा उल्लेख केल्याने संघटनेने घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरणात तणाव होता. मात्र, यावेळी कोणताही संघर्ष झाला नाही.

एसएफआयवर टीका करत राज्यपाल वातावरण बिघडवत आहेत. तसेच संघटनांना चिथावणी देत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता राज्यपाल खान म्हणाले, तो टग्या… तुम्हाला त्याचा इतिहास माहीत आहे ना. कन्नूरमध्ये किती खूनांमध्ये त्यांचा सहभाग आहे. किती खुनांमध्ये त्यांचा हात आहे. त्यामुळे टग्या काय म्हणाला याला महत्त्व देत नाही, अशा शब्दांत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे केरळमध्ये पुन्हा एकदा राज्यपाल- मुख्यमंत्री संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.