आरक्षण बचावसाठी बहुजनांचा चंद्रपुरात मोर्चा

राज्य सरकारच्या नव्या परिपत्रकामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथील झाल्याने आरक्षण मिळविण्यासाठी बोगस लोकांची – घुसखोरी होण्याची भिती व्यक्त करीत या निर्णयाच्या विरोधात एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाच्या समुहाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून्यात आले.

राज्य सरकारने 27 डिसेंबर 2023 आणि 26 जानेवारी 2024 रोजी नवीन मसूदा काढला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ‘सगेसोयरे’ या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने राजपत्र असाधारण भाग 4 ब चा मसूदा प्रसिद्ध केला आहे. हा मसूदा आरक्षण घेत असलेल्या प्रवर्गासाठी भविष्यात धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्या विरोधात ओबीसी, एससी, एससी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिक एकवटत शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केलं. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो ओबीसी महिला पुरुष सहभागी झाले होते.