आता वैद्यकीय तपासणीतून खरं खोटं स्पष्ट होईल

indian-navy-boat

नौदलाने अरबी समुद्रात धडक कारवाई करत 35 समुद्री चाच्यांना पकडले होते. ते चाचे सध्या यलोगेट पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील आठ चाच्यांनी ते अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल येईपर्यंत डोंगरीच्या बाल निरीक्षणगृहात ठेवले आहे. अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

सोमालियापासून 260 नॉटिकल मैल अंतरावर  अरबी समुद्रात बल्गेरिया देशाच्या कार्गो जहाजावर ताबा मिळवून 35 समुद्री चाच्यांनी शस्त्राच्या धाकावर जहाजावरील 17 क्रू सदस्यांचे अपहरण केले होते. तसेच या क्रू सदस्यांची सुटका करण्यासाठी जहाज मालकाकडे 60 दक्षलक्ष अमेरिकन डॉलरची मागणी त्यांनी केली होती. हा सर्व प्रकार सुरू असताना हिंदुस्थानी नौदलाची ‘आयएनएस कोलकाता’ ही युद्धनौका त्या क्रू सदस्यांच्या मदतीला धावली आणि नौदल जवांनानी भरसमुद्रात ऑपरेशन करून 35 समुद्री चाच्यांना पकडले होते. त्या चाच्यांना मग पुढील कारवाईसाठी यलोगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान त्यातील आठ चाच्यांनी ते अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे.त्या आठही चाच्यांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून ते नेमके किती वर्षांचे आहेत ते स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला जाईल.