पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात विक्रमी वाढ, गतवर्षीच्या तुलनेत 500 कोटी अतिरिक्त महसूल

राज्य शासनाला महसूल मिळवून देण्यात मोठा वाटा असलेल्या उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाला यंदाच्या वर्षी तब्बल 2 हजार 735 कोटींचा महसूल मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 22 टक्क्यांंनी म्हणजेच 504 कोटींनी जास्त आहे. छुपी दारू वाहतूक, अवैध दारू विक्रीवर केलेल्या प्रभावी कारवाईसह महसूल वाढीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदा महसूलात वाढ झाल्याचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांनी सांगितले.

बनावट मद्यनिर्मिती आणि बेकायदेशीर मद्य वाहतूक व विक्री रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे असते. या विभागाकडून मद्यार्कयुक्त पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंदर्भातल्या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याचीही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाकडे असते. उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने मागील वर्षभरात म्हणजेच 2023 – 24 या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारूचे साठे उद्ध्वस्त केले. तसेच, दारूनिर्मितीसह परराज्यातून छुप्या पद्धतीने जिल्ह्यात येणारी कोट्यावधींची दारू जप्त केली. अनेक गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करून अनेकांना अटक देखील केली. या सर्व कारणांमुळे यंदा उत्पादन शुल्कच्या महसूलात वाढ झाली आहे. यंदा विभागाला 2 हजार 735 कोटींचा महसूल मिळाला. तर, गतवर्षी हा महसूल 2 हजार 231 कोटी एवढा होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी 501 कोटींची वाढ झाल्याचे दिसून येते. एकूण 22.59 टक्के एवढी ही वाढ आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षीपेक्षा यंदा देशी मद्य, बीअर व वाईनच्या विक्रीमध्ये वाढ झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशी मद्याच्या विक्रीमध्ये 7.3 टक्के, विदेशी मद्याच्या विक्रीत 10.7 टक्के, बीअर विक्रीत 10.6 टक्के तर वाईन विक्रीत 0.5 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय विभागाने वारंवार गुन्हे करणार्‍या 10 आरोपींवर एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आहे.

…निवडणूक कालावधीत 17 पथके तैनात
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री होण्याची शक्यता विचारात घेता उत्पादन शुल्क विभागाने नियमीत 14 व 3 विशेष अशी एकूण 17 पथके तैनात केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. राज्य शासनाचा महसूल चूकवुन परराज्यातून येणार्‍या दारूवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये 17 पथके चोविस तास गस्तीवर असून अवैध मद्यवाहतूकीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी तात्पूरते तपासणी नाके उभारण्यात आली आहेत. यामाध्यमातून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
– चरणसिंह रजपूत, अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे.