विद्यार्थिनींना मिळणार मासिक पाळीची सुट्टी, आणखी एका विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय

मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी मिळावी की नाही या विषयावर अद्यापही देशपातळीवर चर्चा सुरू आहेत. मात्र, या दरम्यान काही विद्यापीठांनी सुट्टीसाठी तरतूद केली आहे. यात आणखी एका विद्यापीठाची भर पडली असून पंजाब विद्यापीठाने मासिक पाळीसाठी विद्यार्थिनींना सुट्टी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबत काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.

पंजाब विद्यापीठाकडून आगामी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थिनींना काही अटी-शर्तींसह ही सुट्टी देण्यात आली आहे. पण, सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थिनींना विभागाच्या कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल. तो अर्ज केल्यानंतरच सुट्टीसाठी परवानगी मिळेल. मात्र, ही सुट्टी फक्त एक दिवसासाठीच असेल. एक विद्यार्थिनी महिन्यात फक्त एकदाच हा अर्ज करू शकते. तसंच, संबंधित विद्यार्थिनीने 15 दिवस भरलेले असतील तरच ती सुट्टी मंजूर करण्यात येईल. या हिशोबाने प्रत्येक सत्रात चार दिवसांची सुट्टी मिळू शकेल.

परीक्षा काळात मात्र असा अर्ज करता येणार नाही. विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेत हा अर्ज भरून परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर विद्यार्थिनीच्या हजेरी आणि इतर सुट्ट्यांविषयी तपासणी करून मगच परवानगी मिळेल. तसंच, या सुट्टीचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही.

मासिक पाळीत विद्यार्थिनींना रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वप्रथम केरळच्या कोचीन विद्यापीठाने घेतला होता. जानेवारी 2023 पासून मासिक पाळीच्या सुट्टीची सुरुवात केली होती. आसामच्या गुवाहाटी विद्यापीठाने, नालसर विद्यापीठ आणि आसामच्या तेजपूर विद्यापीठाने यापूर्वीही अशा प्रकारची रजा मंजूर केली आहे.