इलेक्टोरल बॉन्ड ही खंडणी वसुली योजना आणि मोदी त्याचे सूत्रधार, राहुल गांधी यांचा निशाणा

इलेक्टोरल बॉन्ड ही जगातली सगळ्यात मोठी खंडणी वसुली योजना आहे आणि त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीसंदर्भात राहुल गांधी यांनी ही टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत इलेक्टोरल बॉन्डते व्यवहार हे पारदर्शक असल्याचं म्हटलं. त्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, इलेक्टोरल बॉन्डविषयी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नावं आणि तारखा. जर तुम्ही नावं आणि तारखा पाहाल तर तुम्हाला समजेल की जेव्हा त्यांनी बॉन्ड खरेदी केले, त्यानंतर लगेचच त्यांना एखादं कंत्राट मिळालं किंवा त्यांची होणारी चौकशी हटवण्यात आली. पंतप्रधान या प्रकरणात पुरते सापडले आहेत, म्हणून ते मुलाखत देत आहेत. ही जगातली सगळ्यात मोठी खंडणी वसुली योजना आहे आणि त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आहेत. जर तुम्ही त्या मुलाखतीत त्यांच्या नजरेत पाहाल तर तुम्हाला त्याची झलक दिसेल, असं राहुल गांधी यांनी माध्यमांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

याच मुलाखतीत मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला. या मुलाखतीतील ‘जे विरोध करताहेत त्यांना पश्चात्ताप होईल’, या मोदींच्या वाक्यावर प्रत्युत्तर देताना राहुल म्हणाले की, विरोधाचा प्रश्नच नाही. तुम्ही पंतप्रधानांना सांगा की त्यांनी आधी सीबीआय चौकशी मग इलेक्टोरल बॉन्डची खरेदी आणि त्यानंतर बंद होणारी चौकशी या घटनांच्या क्रमवारीविषयी उलगडून सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे बॉन्ड खरेदीनंतर ताबडतोब सदर कंपनीला हजारो कोटींचं कंत्राट मिळतं, हे कसं काय तेही पंतप्रधानांनी समजवावं. सत्य हेच आहे की ही खंडणी आहे. नरेंद्र मोदीच या सगळ्याचे सूत्रधार आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.