पक्षात किती वर्षे आहात विचारणाऱ्या रक्षा खडसेंना कार्यकर्त्याने खडसावले; भाजपच्या बैठकीचा व्हीडीओ व्हायरल

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना दुसऱ्यांदा खासदारकी जाहीर झाल्यापासून त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत विरोध जागोजागी उफाळून येत आहे. पक्ष बैठक सुरू असताना तुम्ही किती वर्षे पक्षात काम करताय, असे विचारणे रक्षा खडसे यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रश्नाने संतापलेल्या कार्यकर्त्यांने माझ्या वडिलांनी एकनाथ खडसे यांच्या प्रचारासाठी नोकरी सोडली. कोणताही आर्थिक आधार नसल्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून मी भाजपचे काम करतो आणि तुम्ही मला विचारताय कधीपासून काम करतो? हे काही बरोबर नाही, असा हिशेब सांगत रक्षा खडसे यांची बोलती बंद केली.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राग का?
खडसेंची सून असल्याने रक्षा खडसे यांचे यंदा तिकीट कापले जाण्याची चर्चा होती, मात्र भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे संतापलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला. त्यात आता रक्षा खडसे प्रचारातूनही डावलत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. प्रचारात मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते घेऊन प्रचार करत असल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी भर बैठकीत केली. गिरीश महाजन यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला, मात्र महाजन यांनी अत्यंत तटस्थपणे मोजके शब्द उच्चारत मौन बाळगणेच पसंत केले.