रत्नागिरी सावकारी कर्जाच्या विळख्यात; आतापर्यंत 10 जणांविरुद्ध तक्रारी, अनेक सावकार रडारवर!

रत्नागिरी जिल्ह्यात सावकारी कर्जाच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. सावकारी कर्जात अनेकांची पिळवणूकही झाली असून काहीजणांनी आत्महत्येपर्यंतचे पाऊल उचल्याची माहिती पुढे येत आहे. आतापर्यंत सावकारी कर्ज देणाऱ्या 10 जणांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. रत्नागिरीत सुरू असलेल्या सावकारीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष दिले असून लवकरच या सावकारीचा बिमोड केला जाणार आहे.

एक लाख रूपये सावकारी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे 40 लाख रूपये कर्ज झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वैभव राजाराम सावंत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाळीस जणांनी कर्जाची नोटरी केल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. पत्रकारांशी शुक्रवारी बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या सावकारी कर्जाच्या विषयावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अनेक जण त्या सावकारी कर्जाला बळी पडले आहेत. काहींनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. परवा उघडकीस आलेल्या प्रकारात त्याने 1 लाख 20 हजाराचे कर्ज घेतले. त्याला दर महिना 20 टक्के व्याज म्हणजे वर्षाला 240 टक्के व्याज लावले. चक्रवाढ पध्दतीने व्याज लावून त्याची रक्कम 40 लाख रूपये केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

सावकरी कर्ज देणाऱ्यांचा शोध सुरू
पोलिसांनी सावकारी कर्जाबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केल्यानंतर सावकारी करणाऱ्या 10 जणांविरूद्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असून कामगार व सर्वसामान्य त्याला बळी ठरले आहेत.जिल्ह्यात सावकारी कर्ज देणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

अवैध सावकारी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ ईमेल/अर्ज अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करू शकता. अवैध सावकारी व त्यातून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल कठोर पाऊले उचलेल. कर्ज घेण्याच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा.
– धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी