अश्विनवर सोनं आणि धनाचा वर्षाव

 

हिंदुस्थानसाठी 100 कसोटी खेळण्याचा आणि 500 विकेट्सचा अभूतपूर्व विक्रम पूर्ण करणाऱया रविचंद्रन अश्विनवर तामीळनाडू क्रिकेट संघटनेने सोनं आणि धनाचा अक्षरशः वर्षाव केला. त्याचा गौरव करताना संघटनेने त्याला 500 सोन्याची नाणी आणि एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाने 4-1 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, याच मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. अश्विनने या मालिकेतून कारकीर्दीतील 100 कसोटी सामने आणि 500 कसोटी विकेट पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा अश्विन हा जगातील नववा तर दुसराच हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने पाच सामन्यांत 26 विकेट टिपल्या होत्या.

धोनीचे मनापासून आभार

अश्विनने आपल्या काwतुक सोहळ्यात  महेंद्रसिंह धोनीचे मनापासून आभार मानले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धोनीबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, ‘मला माझ्या मनापासून एम. एस. धोनीचे आभार मानायचे आहेत. त्याने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याचा नेहमीच ऋणी राहीन. त्याने मला खूप काही दिले आहे. त्याने मला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली.’