परीक्षण – सकारात्मक विचारांची ‘अक्षरयात्रा’

>> आशीष निनगुरकर

कोरोनाच्या काळात घरात बसून पूर्ण थांबून गेलो होतो. त्या वाईट काळातूनदेखील अनेक नव्या गोष्टी जन्माला आल्या. वाईटातूनदेखील नवीन काहीतरी चांगलं होतं. या स्थिरावलेल्या काळात अनेकांनी आपले कलागुण, छंद जोपासले. या गोष्टींमुळे त्यांची नवी उमेद जन्माला आली, जगण्याला एक नवी ऊर्जा मिळाली. याच काळात लेखक जे.डी. पराडकर यांनी प्रत्येक दिवशी एक लेख समाज माध्यमावर लिहिला व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच सकारात्मक विचारांनी भरलेल्या लेखांचे पुस्तक म्हणजेच ‘अक्षरयात्रा’.

लेखक पराडकर यांची लेखनातील प्रामाणिकता हीच त्यांना सगळ्याच बाबतीत फार सुख देणारी आहे. लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘अक्षरयात्रा’ हे ‘चपराक’तर्फे प्रकाशित होणारे पाचवे पुस्तक आहे. कोकण म्हणजे सुंदर निसर्ग, अंतर्मनाला साद घालणारी बोलीभाषा, येथील चालीरीती, परंपरा हे सारंच अद्भुत आहे. ते म्हणतात ना, ‘कोकणची माणसं साधीभोळी, हृदयात त्यांच्या गोड शहाळी…’ हा अनुभव या पुस्तकाच्या प्रत्येक लेखातून येतो. प्रत्येक लेख वेगळाच अनुभव देणारा आहे. पराडकर यांनी आपल्या 32 वर्षांच्या लेखन प्रवासात कोकणची नाळ कधीही तुटू दिली नाही. ‘जत्रा-यात्रा’ हे शब्द वापरताना साधारणत सांगितलं जातं की, ज्यात ‘जातं’ ती जत्रा आणि ‘येतं’ ती यात्रा! ही तर जे. डी. पराडकरांसारख्या अनुभवसंपन्न पत्रकाराने, लेखकाने लिहिलेली ‘अक्षरयात्रा’ आहे.

शंभर दिवस सातत्याने रोज एक लेख लिहिणं आणि लोकांचं प्रबोधन, रंजन करणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. कोरोनाचा सामना करताना लॉक डाऊनचा कालावधी म्हणजे प्रत्येकाला काळजी वाटणारा, भीतिदायक आणि कंटाळवाणा ठरत होता. अशा वेळी घरी असणाऱया प्रत्येकाला आपल्या लेखणीतून तणावमुक्त करण्यासाठी पराडकर यांनी 27 मार्च ते 5 जुलै 2020 या कालावधीत सलग शंभर दिवस 100 लेख लिहून वाचकांसाठी आपली लेखनसेवा रूजू केली. हे लेख वाचकांना नवचैतन्य देणारे ठरले. हे पुस्तक वाचताना या पुस्तकातील एकाहून एक सरस लेखांसोबत वाचक म्हणून आपलीही अक्षरयात्रा घडते. यात्रा म्हटलं की, लोकानी एकत्र येणं आणि नंतर प्रवास करणं अपेक्षित असतं. या पुस्तकातील लेखांसोबत आपला वाचनप्रवास आनंददायी होतो.

पराडकर यांच्या लेखणीतून कोकण केवळ वाचायला मिळते असे नव्हे, तर ते डोळ्यांसमोर उभे करण्याची ताकद पराडकर यांच्या लेखणीत आहे. छोटे छोटे विषय हलक्याफुलक्या शब्दांत वाचकांसमोर उलगडताना वाचकही या विषयात समरस होऊन जातो. यातील लेख ‘अ-क्षर’ आहेत. काळाच्या ओघात बोलणे नष्ट होते; पण जे लिहून ठेवलेले असते ते घटत नाही, नष्ट होत नाही! त्यात पराडकरांसारख्या लेखकाच्या लालित्यपूर्ण शब्दांचा स्पर्श झाल्यावर तर ती ‘अक्षरयात्रा’ आणखी संपन्न आणि समृद्ध होते. प्रत्येक लेखातून आपल्या डोळ्यांसमोर एकेक पात्र उभे राहते. हे पात्र केवळ पात्र नाही, तर आपल्या आजूबाजूला असणाऱया लोकांचे एक प्रतिबिंबच आहे. प्रत्येक लेखातून मिळणारा वाचनानंद सुखावणारा आहे.एका शब्दावरून विस्तृत लेख लिहिण्याची जे. डी. यांची खासीयत आहे.

लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या 100 लेखांत त्यांचे सारे लेखनकौशल्य अनुभवायला मिळाले. आपले लेखन आपल्यासह वाचकांनाही आनंद देत राहावे हा त्यांचा उद्देश नक्कीच अभिनंदनीय आहे. ‘अक्षरयात्रा’ या पुस्तकात त्यांनी निवडक लेखांचा समावेश केला आहे. यातील सर्वच लेख वाचनीय व दर्जेदार आहेत. त्यामुळे प्रत्येक लेख आपल्या काळजात घर करून राहतो.

चपराक प्रकाशनची प्रत्येक निर्मिती ही सकस व दर्जेदार असते. या पुस्तकाची बांधणी हार्ड कव्हर पद्धतीची असून याची शब्दलिपीही उठावदार व लक्षवेधी आहेत. पुस्तक संपूर्ण सचित्र नसले तरी पुस्तकाची मांडणी सुरेख असल्याने पुस्तक हातात येताच वाचण्याचा मोह आवरत नाही. या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. उत्तम लेखांची मांडणी असणारी ही ‘अक्षरयात्रा’ प्रत्येकाने अनुभवावी अशी आहे.
अक्षरयात्रा
लेखक : जे.डी.पराडकर
प्रकाशक : चपराक प्रकाशन
पृष्ठे : 256 पाने मूल्य : 400 रुपये