सामना अग्रलेख – सनातन धर्माचे धडे!

सरकार संसदेच्या कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालत आहे तिकडे मणिपुरातील दोन जमाती एकमेकांना गोळय़ा घालत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांचा मात्र सनातन धर्माचा जप सुरू आहे. भाजपास सनातन धर्माची चिंता वाटणे हे ढोंग आहे. भाजपच्या सनातन धर्मातबीफम्हणजे गोमांस वर्ज्य आहे, पण भाजपचे अनेक मंत्री नेते गोमांस खाण्याचा पुरस्कार करतात. गोवा तसेच ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री सुरूच आहे. त्यामुळे गोमांस भक्षणासंदर्भात स्वतः भाजप गोंधळात गोंधळ करीत असून इतरांना सनातन धर्माचे धडे देत आहे. हे धडे त्यांनी आधी त्यांच्या आघाडीतीलअण्णा द्रमुकसारख्या पक्षांना द्यावेत.

भारतीय जनता पक्षाचे सनातन धर्मावरील प्रेम उतूमातू लागले आहे. आपण व आपले अंधभक्त म्हणजे हिंदू अशा अंडकोशात ते वावरत आहेत. तामीळनाडूतील द्रमुक पक्षाने सनातन धर्मावर विचित्र टीकाटिपण्या सुरू केल्याने आता ‘इंडिया’ आघाडीचे काय व कसे होणार, अशा चिंता भाजपास पडल्या, पण हाच ‘द्रमुक’ पक्ष कधीकाळी भाजपप्रणीत ‘एनडीए’चाही घटक होता व आज त्यांचे जे धर्मविचार आहेत तेच त्या काळातही होते. द्रमुक ‘एनडीए’त असताना तेव्हा काही झाले नाही. त्यामुळे ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत. आज भाजपसोबत असलेल्या ‘अण्णा द्रमुक’ पक्षाचे विचार, भूमिका या सनातन धर्माबाबत ‘द्रमुक’प्रमाणेच आहेत. दुसरे म्हणजे फक्त ‘द्रमुक’ म्हणजे ‘इंडिया’ आघाडी नाही. त्यामुळे भाजपने उगाच नको तिथे खाजवत बसण्याची गरज नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. जे. पी. नड्डा यांनी आता सांगितले की, ‘‘सनातन धर्माला लक्ष्य करण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा छुपा कार्यक्रम आहे.’’ नड्डा म्हणतात, ‘‘सनातन विचारधारेच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकत्र झाली आहे.’’ डॉ. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून येतात. ते त्यांचे गृहराज्य आहे. त्यांच्या राज्यात धर्माच्या अतिरेकाचा पराभव झाला असून नड्डा व त्यांचे लोक सांगतात तो हिंदू धर्म किंवा संस्कृती नाही. मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झाले आहे व हा सरळ सरळ धर्मद्रोह आहे. धर्माच्या नावावर भेदाभेद, नरसंहार, अस्पृश्यता म्हणजे ‘सनातन’ धर्म नव्हे. आता ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काही महत्त्वाची माहिती उघड केली आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीपूर्वी गुजरात दंगलीप्रमाणे देशातील मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार घडविण्याचा भाजप व

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव

आहे, असे श्री. आंबेडकरांनी सांगितले. आंबेडकर म्हणतात ते खोटे आहे काय? व ते खोटे असेल तर सरकारने ऍड. आंबेडकरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवायला हवे. सनातन धर्म म्हणजे पारदर्शक विचारांचा प्रवाह. सनातन धर्म म्हणजे कलंकित लोकांची पापे धुणारी ‘वॉशिंग मशीन’ नव्हे. सनातन धर्म म्हणजे गंगामाई. सनातन धर्म ही राजकीय स्वार्थाची गटारगंगा नव्हे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी त्यांच्या धर्मसंकल्पनेची व्याख्या स्पष्ट केली आहे. ‘‘जे भ्रष्टाचारी नेते आहेत, ज्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती वाटते आहे अशा नेत्यांसाठी भाजपची दारे उघडीच आहेत.’’ भाजपच्या सनातन धर्माचा हा खरा चेहरा आहे. सनातन धर्म म्हणजे फक्त पोथ्या, पुराणे, वेद नाहीत. मानवता व शुद्ध आचरण, मातृभूमीचे रक्षण अशा कर्तव्याचे पालन करणे हेसुद्धा धर्मकर्तव्य आहे. आज जो धर्म विकृत व हिडीस स्वरूपात भाजपने समोर आणला त्यापासून देशाला आणि समाजाला धोका आहे. त्यामुळे जगात सनातन धर्माची नाचक्की होत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे ‘जी-20’ संमेलनासाठी भारतात आले. कॅनडात खलिस्तानी अतिरेक्यांनी उचल खाल्ली असून हिंदुस्थानचे तुकडे तुकडे करू, अशा घोषणा कॅनडाच्या रस्त्यावर देणाऱ्यांना कॅनडाचे सरकार मोकळे का सोडत आहे? हा दहशतवाद कॅनडा खपवून घेत असेल तर भारतास कठोर पावले उचलावी लागतील, असे पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना बजावले. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. कॅनडा, पाकिस्तानसारख्या देशात भारतविरोधी दहशतवाद मान्य नसेल तर भारतात भाजप पुरस्कृत काही संघटना धर्माच्या नावावर जी अतिरेकी कृत्ये करीत आहेत त्यांना मोदी सरकारने पाठीशी का घालावे? उत्तर प्रदेश, हरयाणा, गुरगाव, साताऱ्यातील हिंसेमागे कॅनडातील अतिरेकी नाहीत. ते आपल्याच सनातन धर्मातले लोक आहेत व अशा

स्वधर्मी अतिरेक्यांना

आवर घातला नाही तर धर्माचे रक्षण होण्याऐवजी अधःपतन होईल. सत्तावीस प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी निर्माण केली. त्याची इतकी धास्ती भाजपने घेतली की, ‘इंडिया’चे नाव छुप्या पद्धतीने बदलून त्यांनी ‘भारत’ पुकारायला सुरुवात केली. इंडिया हा शब्द त्यांनी पाहिला किंवा ऐकला की त्यांना घाम फुटतो. सनातन धर्म इतका डरपोक आणि हतबल कधीच नव्हता. आता त्यांनी आपल्या दळभद्री राजकारणाचे नवेच प्रकरण समोर आणले. काय तर म्हणे, 18 ते 22 या दरम्यान संसदेचे जे विशेष अधिवेशन बोलावले त्या काळात संसदेच्या कर्मचाऱ्यांचा रुबाबदार गणवेश बदलून कमळाची फुले चितारलेला नवा गणवेश व मणिपुरी टोपी असा काहीसा प्रकार ते करणार आहेत. खाली खाकी रंगाची पॅण्ट असेल. पॅण्ट हाफ की फुल ते समजले नाही. हे असे पोरखेळ केल्याने सनातन धर्माचे काय कल्याण होणार ते त्यांनाच माहीत. मणिपुरातील हिंसा व जातीयवादाचा उद्रेक अशाने थांबणार नाही. संसदेच्या शे-पाचशे कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालायला देऊन सरकार बेगडे मणिपुरी प्रेम दाखवत आहे. हा मजकूर लिहीत असतानाच मणिपुरात हिंसेचा नवा आगडोंब उसळला व त्यात चार जणांची गोळय़ा घालून हत्या केली. सरकार संसदेच्या कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालत आहे व तिकडे मणिपुरातील दोन जमाती एकमेकांना गोळय़ा घालत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांचा मात्र सनातन धर्माचा जप सुरू आहे. भाजपास सनातन धर्माची चिंता वाटणे हे ढोंग आहे. भाजपच्या सनातन धर्मात ‘बीफ’ म्हणजे गोमांस वर्ज्य आहे, पण भाजपचे अनेक मंत्री व नेते गोमांस खाण्याचा पुरस्कार करतात. गोवा तसेच ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री सुरूच आहे. त्यामुळे गोमांस भक्षणासंदर्भात स्वतः भाजप गोंधळात गोंधळ करीत असून इतरांना सनातन धर्माचे धडे देत आहे. हे धडे त्यांनी आधी त्यांच्या आघाडीतील ‘अण्णा द्रमुक’सारख्या पक्षांना द्यावेत.