विज्ञान-रंजन – लव्हलॉक सांगून गेले पण…!

>> विनायक

लेख लिहीत असताना म्हणजे काल-परवाचीच गोष्ट. मुंबईत आकाश ढगाळलेलं. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात किती पाऊस पडणार याची माहिती देणाऱया बातम्यांवर नजर टाकताना मनात आले, हेच तर जेम्स लव्हलॉक सातत्याने ऐंशी वर्षे सांगत होते. पण शास्त्र्ाज्ञांचं सांगणं कोण लक्षात घेतो. त्यांच्या ऐंशी वर्षांच्या अनेक भाकितांची जगाने ‘ऐशी की तैशी’ करून पृथ्वीला पर्यावरणाच्या गंभीर समस्येकडे न्यायला हातभार लावला. याला जबाबदार कोण? तर तुम्ही-आम्ही…आपण सर्व. पर्यावरणाची समस्या, बदलतं हवामान, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक गोष्टी या द्रष्टय़ा संशोधकाला 1930 च्या दशकातच दिसू लागल्या होत्या. 103 वर्षांच्या जीवनात लव्हलॉक यांनी वडिलांकडून बालपणी मिळालेल्या निसर्गज्ञानाला आपल्या चिकित्सक अभ्यासाची जोड दिली. झाडे-पाने, पशू-पक्षी, वन्यजीव या गोष्टींचा अभ्यास करताना माणसापलीकडेही सजीवसृष्टीचा विशाल व्याप आहे हे त्यांनी ओळखले. माणूस नावाच्या एकमेव प्राण्याच्या विपरित करणीने ही जीवसृष्टी धोक्यात येतेय अशी ‘धोक्याची घंटा’ही त्यांनी वाजवली, परंतु तथाकथित सुखोपभोगात गुंतलेल्या जगाने त्याची पर्वा केली नाही.

मग त्यांनी माणूस पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार करणार नसेल तर पृथ्वी तो (नैसर्गिकरित्या) स्वतःच करेल अशी मांडणी (हायपोथिसिस) केली. 1914 पासून 1945 पर्यंत दोन महायुद्धांच्या काळात पाश्चात्य जगात झालेली शस्त्रास्त्र वाढ, त्यातून उद्भवणारे प्रदूषण आणि सुखकारक आयुष्यासाठी वापरात येणाऱया ‘एसी’सारख्या उपकरणांमधूनही वापरलेले जाणारे ‘क्लुरोफ्लोरोकार्बन’सारखे वायू उद्या सर्वांनाच त्रासदायक ठरतील असे ते सांगू लागले. काही रासायनिक संयुग बराच काळ वातावरणात कशी टिकतात आणि त्यातून श्वसनाचे आजार कसे होऊ शकतात यावर ते चर्चा करत.

लव्हलॉक यांचं संशोधन बहुआयामी होतं. महायुद्धात वापरल्या गेलेल्या दारूगोळय़ामुळे अनेकांना झालेल्या जखमा वेगाने ठीक व्हाव्यात यावर त्यांनी संशोधन केलंच, पण त्याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे सूर्याच्या अतिनील (अल्ट्राव्हायलेट) किरणांपासून पृथ्वीवासीयांचं रक्षण करणारा ‘ओझोन’ O3 वायूचा थर नष्ट होऊन उदय़ाच्या पिढय़ांना त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतील याचा ऊहापोह केला. त्यामुळे जगाला थोडीशी जाग आली. सीएफसीचा वापर कमी झाला. जागतिक पर्यावरण परिषदांमध्ये बदलत्या हवामानाने निर्माण होणाऱया प्रश्नांवर निदान चर्चा तरी होऊ लागली. वैज्ञानिकांनी केलेले निदान मात्र स्वीकारताना प्रगत म्हणवणारे देशही दुटप्पी भूमिका घेऊ लागले. मात्र पृथ्वीवर प्रेम करणाऱया लव्हलॉक यांना कधी निराशा आली नाही. ते पर्यावरण आणि जैवसंवर्धनाचे विविध प्रयोग करण्यात गुंतले होते. क्रायोप्रिझर्व्हेन’चा शोध लावून त्यांनी रोडेन्ट (घुशीसारखा प्राणी) आणि हॅमस्टर्स (बिनशेपटीचा पाळीव प्राणी) या प्राण्यांना त्यांच्या मेंदूत 60 टक्के पाणी भरून ‘फ्रीज’ करण्याचा आणि पुन्हा ‘जिवंत’ करण्याचा यशस्वी प्रयोग केला. मेंदूतील पाण्याचे हिमकण तयार झाल्यावरही त्यामुळे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत असे त्यांनी नोंदले. मात्र या प्राण्यांच्या इतर अवयवांवर विपरित परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली.

1970 मध्ये नासाने सुरू केलेल्या व्हायपिंग या मंगळ मोहिमेत त्यांचा वैज्ञानिक म्हणून महत्त्वाचा वाटा होता. मंगळावर सजीव जगू शकतील का? या गोष्टीचाही विचार केला. ‘क्रायोनिक्स’ म्हणजे ‘गोठवलेली’ माणसेही कालांतराने पुन्हा जागी होऊ शकतील का, यावर त्या काळात बरीच चर्चा झाली. अजूनही होत असते. 2000 मध्ये लव्हलॉक यांनी वातावरणात सतत वाढणाऱया ‘कार्बन डायऑक्साइड’वर जगणारं ‘शेवाळ’ शोधण्यासाठी क्लायमेट इंजिनीअरिंगची कल्पना मांडली. 1970 मध्ये ‘गाइया हायपोथिसिस’ मांडून पृथ्वी स्वतःच कसे आत्मरक्षणाचे उपाय योजेल असे मत व्यक्त केले आणि ते पुन्हा चर्चेत आले. आयुष्यभर पृथ्वी, पर्यावरण, माणूस आणि एकूणच जीवसृष्टीचा विचार करणारे जेम्स लव्हलॉक 2019 मध्ये 100 वर्षांचे झाले. 2022 मध्ये ते गेले तेव्हा त्यांना 103 वे वर्ष लागले होते. पृथ्वीवरचं सर्वांगीण जीवन समृद्ध व्हावं हा त्यांचा ध्यास होता. आज बदलत्या हवामानाचे मुख्यत्वे शेतीवर आणि एकूणच जीवनावर होणारे त्रासदायक ते घातक परिणाम पाहिले की, लव्हलॉकसारख्या ऋषीतुल्य व्यक्तींचं स्मरण होतं.