चार दिवस महापालिका रुग्णालये बंद ठेवणार? परिचारिकांसह वरिष्ठ डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपले

आधीच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना निवडणुकीची कामे देऊ नये, यासाठी सर्व कर्मचारी आणि कामगार संघटना आक्रमक असताना आता मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टरांसह परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱयांना लोकसभा निवडणुकीच्या कामात जुंपण्याचे आदेश आल्याने आधीच कर्मचाऱयांची कमतरता असताना आता काय चार दिवस ही रुग्णालये बंद ठेवणार का, असा संतप्त सवाल डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱयांनी विचारला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळाची कमतरता असेल तर खासगी संस्था किंवा स्वयंसेवी संस्थांकडून मनुष्यबळाची मदत घ्या. मात्र रुग्णालये, पाणीपुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नका, अशी मागणी महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेसह इतर प्रमुख संघटनांनी वेळोवेळी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने याला दाद दिली नाही. आता केईएम, नायर, सायन, कूपर या प्रमुख रुग्णालयांतील वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका यांच्यासह वैद्यकीय आणि कार्यालयीन कर्मचाऱयांना लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश आल्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

महापालिकेच्या कामांचा बोजवारा 

पावसाळा तोंडावर आला असताना पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी, जल विभाग, मलनिःसारण विभाग, रस्ते विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग अशा 16 विभागांतील 50 हजार स्टाफ निवडणूक कामाला जाणार असून 12 हजार कर्मचारी आधीच निवडणूक डय़ुटीत व्यस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळी कामकाजावरही मोठा विपरित परिणाम होणार आहे.

शस्त्रक्रिया रखडणार  

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत दररोज शेकडो शस्त्रक्रिया होतात. मात्र डॉक्टर, परिचारिका निवडणुकीच्या डय़ुटीला गेल्याने शस्त्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती रुग्णालयातील वरिष्ठांनी व्यक्त केली.

डॉक्टर्स, परिचारिकांना निवडणूक कामातून वगळणार

लोकसभा निवडणूक 2024साठी मुंबई उपनगर जिह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी/कर्मचाऱयांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. महापालिपेचे डॉक्टर्स, परिचारिका यांना या निवडणुकीदरम्यान सेवा बजावण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. मात्र वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस यांना निवडणूक विषयक देण्यात आलेल्या आदेशांची माहिती घेऊन अशा अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांचे निवडणूक विषयक कामाबाबतचे आदेश तत्काळ रद्द करण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी रात्री उशिरा कळवले. 

चार दिवस देणार प्रशिक्षण 

वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका यांच्यासह वैद्यकीय आणि कार्यालयीन कर्मचाऱयांना लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी एप्रिल महिन्यात चार दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदाना दिवशी पोलिंग बुथवर डय़ुटी लावण्यात येणार आहे. केईएम, नायर, प्रमुख रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह 800हून अधिक कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपले जाणार आहेत.