पेटलेलं वातावरण शांत करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकीचा कालावधी लांबवला – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे असे पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान तब्बल महिनाभर चालणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे. ”सध्या यांच्याविरोधात जे पेटलेलं वातावरण आहे ते शांत करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकीचा कालावधी लांबवला गेला आहे’, अशी टीका उद्धव ठाकरे य़ांनी केली आहे. डोंगरी येथील शिवसेना शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकार व भाजपवर हल्लाबोल केला.

”1977 ला शिवसेनाप्रमुखांनी इथे याच ठिकाणी अशीच एक सभा घेतली होती. ती आणिबाणीनंतरची निवडणूक असणार आणि आता आणीबाणी येऊ नये म्हणून ही निवडणूक आहे. मी शिवसेनाप्रमुखांची सभेची जागाही सोडलेली नाही आणि त्यांचे विचारही सोडलेले नाहीत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”मुंबईत 20 मे रोजी मतदान आहे. खूप वेळ आहे पण गाफिल राहू नका. मुंबईत बरेचसे कोकणी लोकं राहतात. परिक्षा संपणार, उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये कोकणी लोकं कोकणात जाणार. पण 20 तारखेला यांचे 12 वाजवण्यासाठी मला तुम्ही सर्व मुंबईत हवे आहात. यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले आहेत. अरविंद सावंत यांनी गेल्या दहा वर्षातला त्यांच्या कार्याचा अहवाल सादर केला आहे. तसा गेल्या दहा वर्षांत मोदी शहांनी व भाजपने काय केले त्याचा अहवाल सादर करायला हवा. त्यात किती कुटुंब फोडली, किती कंपन्या विकल्या, किती पक्ष फोडले, सरकारं पाडली असाच कर्मदारिद्री असणार यांचा अहवाल. दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत. दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारायचा. हल्लीच यांनी काही स्थानकांची नावं बदलली. आता एक खासदार त्याचं श्रेय घेत आहे. पण सगळ्यांना माहित आहे की त्यासाठी कुणी प्रयत्न केले होते. नावं बदलणं आणि नावं ठेवणं इतकंच येतंय यांना. हिंमत असेल तर महाराष्ट्रातले उद्योग जे तिकडे गुजरातला गेले त्याबद्दल मोदींना पत्र लिहा. गुजरातशी आमचं काहीही भांडण नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं सगळं देऊ. पण गुजरातची प्रगती करताना महाराष्ट्राचे लचके का तो़डताय? महाराष्ट्राला आम्ही तुम्हाला ओरबाडू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.

”नुकतंच मी ऐकलं की यांनी निवडणुकीच्या कामाला आरोग्य कर्मचारी नेमले आहेत. आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. आणि त्यात आता हे कर्मचारी त्यांची कामं सोडून हे काम करणार. आता यांचं निवडणूक रोख्यांचं बिंग फुटलं आहे. एक जमाना असा होता की मारूती 1000 घेतली की खंडणीसाठी फोन यायचा. तसे हे आता सरकारी यंत्रणा यांचे भाई झाले आहेत. हे कंपन्यांवर धाडी टाकतात नंतर त्यांच्या चौकश्या करतात. सेटलमेंट झाली की सर्व शांत. चौकश्या बंद. राहुल गांधी बोलले की सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या उकळल्या जात आहे. ज्या कंपन्यांवर छापे पडले त्या कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले व देणग्यांच्या स्वरुपात यांना दिले आहेत. महाराष्ट्रात यांच्या प्रचंड प्रमाणात जाहीराती सुरू आहेत. मी मुख्यमंत्री असताना जाहीराती असायच्या त्यावर कोरोना व्हायरसचं चित्र असायचं. आता दाढीवाल्याचं चित्र असतं. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. कामं तर काहीच नाही. शून्य. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचलं की यांनी जाहीरातीसाठी 85 कोटी रुपये आधीच देऊन टाकले आहेत. जर आता आचारसंहिता लागली तर या जाहीराती बंद झाल्या पाहिजे. त्यात यांचे चेहरे येतायत. जर ते चेहरे असलेल्या जाहीराती द्यायाच्या असतील तर तो खर्च यांना त्यांच्या खात्यातून करावा लागेल. यावर आता निवडणूक आयोग काय करणार ते मला बघायचं आहे. जनतेचा पैसा मी त्यांच्या जाहीरातीसाठी वापरू देणार नाही. हे लोकं त्या जाहीरातीच्या एजन्सी कडून देखील कमिशन खात आहेत. त्यामुळे जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची वृत्ती आहे. ही लुबाडणारी लुटणारी वृत्ती गाडायचीच आहे. हुकुमशाही पण जागच्या जागी गाडायची आहे. बघू आता निवडणूक आयोग काय करतंय़, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.