कशासाठी… शिक्षणासाठी! शिवप्रेरणा ज्ञानामृत प्रबोधिनी

>>अनघा सावंत

‘शैक्षणिक क्रांती हाच राष्ट्राचा सर्वांगीण विकास’ हे शिवप्रेरणा ज्ञानामृत प्रबोधिनीचे ब्रीदवाक्य असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्रांती आवश्यक आहे, या जाणिवेने संस्था गेली चार वर्षे मुंबईतील विविध विभागांत मोलाचे कार्य करत आहे.

‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्देशाने महाराष्ट्र घडवला होता. ज्या तत्त्वांनी महाराज चालले होते, ती तत्त्वे प्रबोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे नेऊ शकतो, रुजवू शकतो या उद्देशाने आम्ही शिवप्रेरणाची स्थापना केली. शहरी भागातील ज्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि ग्रामीण भागातील शिकण्याची जिद्द असलेल्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे हा संस्थेचा उद्देश आहे. तसेच व्यक्तींमध्ये सुधारणा करून त्यांना त्यांचे करीअर साध्य करण्यासाठी सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे,’’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक प्रथमेश सावंत आणि अभिषेक कुमकर यांनी दिली.

कोविड काळात संस्थेने मुलांना ऑनलाइन शिकवताना कोणती माध्यमे सोयीची आहेत, ती कशी वापरता येतील यासाठी सर्वप्रथम शिक्षकांना डेमोद्वारे प्रशिक्षण दिले. आसनगाव येथील माहुली गावातील मुलांना कोविडमध्ये खंड पडलेला अभ्यास पुढे कसा सुरू ठेवावा याविषयी मार्गदर्शन करतानाच शैक्षणिक जागरूकतेचे धडे दिले. तसेच अभियांत्रिकी, यूपीएससी, एमपीएससीसाठी ऑनलाइन सेमिनार घेतले. हे संस्थेच्या यूटय़ूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.

पुस्तक हे जीवन घडवू शकते यानुसार ‘एक पुस्तक, एक जीवन’ हे घोषवाक्य अंगीकारत संस्थेने पाली येथील सिद्धेश्वरवाडी या गावात पुस्तकांचे महत्त्व समजून सांगत 900 पेक्षा अधिक पुस्तकांचे दान केले. एवढेच नव्हे तर ग्रंथालयासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देत ‘एकलव्य ग्रंथालय’ उभारून दिले, जे आजही उत्तमरीत्या कार्यरत आहे. संस्था देणगीदारांकडून सुस्थितीतील पुस्तके जमा करून गरज असलेल्या ठिकाणी दान करते आणि गरज भासल्यास पूर्ण ग्रंथालय उभारण्यातही मदत करते. ‘गाव तिथे ग्रंथालय’ या उपक्रमांतर्गत संस्थेने बोरिवली, पाली, जेजुरी, जुन्नर आणि चिपळूण या पाच ठिकाणी पुस्तकदान केले आहे. आतापर्यंत संस्थेने साडेपाच हजारांपेक्षा अधिक पुस्तके दान केली आहेत. अध्यक्षा प्रेरणा इनकर, सेव्रेटरी पुनीत जोशी आणि खजिनदार निकिता पाटील असून अल्पावधीतच संस्थेने उत्तमोत्तम उपक्रम राबवले आहे. संस्थेमध्ये 150 पेक्षा जास्त सभासदांचा आणि 600 पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा एक मजबूत गट असून नियमित सत्रांव्यतिरिक्त, स्वातंत्र्य दिन, महिला दिन, दीपावली इत्यादी सण मुलांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि त्यामागील इतिहास शिकवण्यासाठी साजरे केले जातात.

एक वर्ष, एक गाव
अनेक आदिवासी गावांमध्ये कार्यक्रम आयोजित करताना केवळ एक दिवस तिथे राहून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रभाव निर्माण करू शकत नाही, तर प्रक्रियेसाठी त्यांच्याशी सतत संवाद साधणे आवश्यक आहे, हे लक्षात आल्यावर संस्थेने ‘एक वर्ष, एक गाव’ हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत दर रविवारी संस्थेचे स्वयंसेवक शैक्षणिक अभ्यासक्रम, अतिरिक्त अभ्यासक्रम तसेच व्यावहारीक ज्ञान मुलांना शिकवतात. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवडय़ाला संस्थेच्या मार्गदर्शकांकडून वैयक्तिक सत्रे आयोजित केली जातात. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील चुनापाडा, तुमनी पाडा, मलेपाडा, तलेपाडा, नवापाडा आणि चिंचपाडा या पाडय़ांवर संस्था हा उपक्रम राबवते. येत्या रविवारी असणारे सत्र हे संस्थेचे 100 वे सत्र आहे.