आंबेगावात कांदा रोपांचा तुटवडा; कांदा उत्पादक शेतकरी रोपांच्या शोधात

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत. मात्र यंदा कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. शेतकरी शेजारच्या जुन्नर , शिरूर , खेड या तालुक्यांमध्ये जाऊन कांदा रोपांची खरेदी करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात रोपे शिल्लक आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये कांदा हे प्रमुख पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्यावर्षीच्या साठविलेल्या कांद्यांना उच्चांकी बाजारभाव मिळाले. मात्र, या बाजारभावाचा लाभ कमी शेतकर्‍यांना मिळाला. दुषीत हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे साठवलेले कांदे सडून गेले. असे असूनही कांद्यांना बाजारभाव अधिक मिळेल या आशेने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कांदा लागवडी सर्वाधिक क्षेत्रात करण्याचे ठरवले आहे. गेल्या एक महिन्यापासून या परिसरातील घोडेगाव, लांडेवाडी, मंचर, कळंब, चांडोली, पिंपळगाव, अवसरी, निरगुडसर,पारगाव , शिंगवे , वळती , नागापूर , थोरांदळे आदी परिसरात कांदा लागवडी सुरू आहेत.परंतु या परिसरात कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

या भागातील शेतकरी कांदा लागवडीसाठी अगोदर घरगुती पद्धतीने कांदा रोपे तयार करतात. चालू वर्षी मात्र कांदा रोपांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला.मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने कांदा रोपे झोडपून काढली. अनेक शेतांमधील कांदा रोपांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने ती कांदा रोपे सडून गेली व पिवळी पडली.

आता या परिसरात कांदा लागवडीसाठी रोपांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. कांदा रोपे विकत घेण्यासाठी शेतकरी शेजारील जुन्नर , शिरूर , खेड या तालुक्यांमध्ये ये – जा करताना दिसत आहेत. परंतू ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा रोपे आहेत, ते शेतकरी कांदा रोपांचे भाव अव्वाच्या सव्वा सांगत आहेत. या भागात कायमच मजूर टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांनी यापूर्वीच कांदा लागवडी करणाऱ्या महिला मजुरांच्या टोळ्या बुकिंग केल्या आहे.आता लागवडीसाठी कांदा रोपेच नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.