अडीच वर्षांची मुलगी पोहोचली एव्हरेस्ट बेस कॅम्पवर

उणे 16 डीग्री सेल्सियस तापमान, अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी, अतिशय कमी ऑक्सिजन अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या अडीच वर्षांची चिमुकली माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचली आणि नवा विक्रम रचला. सिद्धी मिश्रा असे या चिमुकलीचे नाव असून ती आई भावना मिश्रा-डेहरियासोबत माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचली. सिद्धीची आई भावना हिने याआधी माऊंट एव्हरेस्टरवर तिरंगा फडकवला आहे. भावनाने मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून सिद्धीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 12 मार्च रोजी मध्य प्रदेशातून काठमांडू येथे सिद्धी आपल्या आईसोबत पोहोचली. त्यानंतर दोघी लुक्ला येथे पोहोचल्या. तिथून फाकडिंग येथून नामचे बाजारपर्यंत ट्रेपिंग केली. येथे तापमान उणे 6 डिग्री सेल्सियस इतके होते. तिथून मायलेकाRनी हळूहळू पुढे चालायला सुरुवात केली आणि आपले ध्येय गाठले.