प्रसंगिक – महिला आणि आत्मसन्मान

>> सुनील कुवरे

जवळपास एक दशकाहून अधिक काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्त्रियांचे माहात्म्य सांगितले जाते. आपल्या हिंदुस्थानातसुद्धा महिला दिनाचे औचित्य साधून सरकार, सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि शाळांतून नानाविध उपक्रम, चर्चासत्रे तसेच कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जातो, परंतु अनेक कार्यक्रमांचा हा देखावा असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पुरुषप्रधान स्त्री – पुरुषांमध्ये समाज व्यवस्थेमुळे जी दरी निर्माण झाली, ती दूर करण्याचे प्रयत्न सामाजिक जाणिवेतून दूर करण्यात आले असले तरी पुरुषप्रधान मानसिकता बदललेली नाही. आज संपूर्ण जगात स्त्री सर्व बाबतीत पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. कोणतेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही, ज्यात तिचा सहभाग नाही. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महिलांना संधी मिळाली आहे. शिक्षकी पेशापासून ते संरक्षण दल, अवकाशात झेप घेण्यापर्यत मजल मारली आहे. तसेच इतर क्षेत्रांतसुद्धा महिला आपले कर्तव्य बजावत आहेत. ज्या संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांची ग्वाही दिली. त्याला अनुरूप या घटना म्हणता येतील.

परंतु स्त्री-पुरुष समानतेचे पर्व सुरू झालेले दिसत असले तरी अजूनही स्त्री पूर्वापार परंपरांच्या जोखडातून पूर्णतः बाहेर आलेली नाही याचा प्रत्यय वारंवार येत आहे. कोणीही यावे, काहीही बोलावे अशी बहुतांश स्त्रियांची सध्याची, खरे तर नेहमीची स्थिती दिसते. एकीकडे महिला शक्ती, दुर्गेचा अवतार संबोधून तिच्याबद्दल आपल्याला फार आदर आहे, असे दाखवायचे, दुसरीकडे तिची अवहेलना करायची. आजही महिलांवर होणारे अत्याचार थांबत नाहीत. शहरी भागात या अत्याचाराचे प्रमाण आणखी वेगळ्या स्वरूपाचे आहेत. कुलदीपकाची कल्पना पुरुषांच्याच नव्हे, तर स्त्रियांच्याही मनातून गेलेली नाही. सरकारने महिलांना संरक्षण दिले पाहिजे, पण तसे होत नाही याची खंत वाटते. सरकारने महिलांसाठी अनेक कायदे बनविले आहेत, पण हे सर्व कायदे कागदावरच आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
एकीकडे महिला सक्षमीकरण झाले पाहिजे असे म्हणत असतानाच दुसरीकडे महिलांना सक्षमीकरणाच्या संधी मिळतात का?. महिला पुरुष समानतेचे हे वारे वाहत असताना राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात महिलांच्या बाबतीत अजूनही सापत्नपणा केला जात आहे. सांस्कृतिक क्षेत्रातदेखील महिलांचे चित्र विकृतपणे रंगविले जाते.