पीकविमा रकमेच्या सुरक्षेसाठी सहा सशस्त्र पोलीस पुरवावे; अनोख्या आंदोलनातून शेतकऱ्यांची मागणी

>> प्रसाद नायगावकर

अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही पिक विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना पस्तीस, पन्नास आणि 90 रुपये अशी अत्यल्प नुकसान भरपाई देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. ह असंतोष शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करत व्यक्त केला. शेतकरी तिजोरीसह पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकले आणि त्यांनी विम्याच्या रकमेसाठी सशस्त्र संरक्षण देण्याची मागणी केली. या आंदोलनाने आज यवतमाळसह राज्याचे लक्ष वेधले आहे. शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी विम्याच्या रकमेच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे. त्यात नमूद केले आहे की, या अर्जामध्ये मी खालील सही करणारा पीकविमा धारक शेतकरी मौजा शिवणी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथील रहिवाशी असुन याद्वारे आपणास नम्र निवेदन करतो की, या वर्षीच्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन या पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला 52 रुपये 99 पैसे इतक्या रकमेचा भरीव पीकविमा मंजुर केला आहे. यामुळे मी खुप खुप व आनंदीत आहे. ही रक्कम माझ्यासारख्या एका गरीब शेतकऱ्यासाठी 50 खोक्यांपेक्षाही मोठी असल्याने या रकमेच्या सुरक्षेची मला फारच काळजी लागली आहे. शिवाय बँकेतून ही रक्कम पिशवी अथवा सुटकेसमधून नेणे मला शक्य नसल्याने रक्कम नेण्यासाठी मी वडिलोपार्जित तिजोरी व बैलबंडी आणली आहे. रुपये 52.99 इतक्या मोठ्या रक्कमेने भरलेली तिजोरी बैलगाडीवरून नेतांना रस्त्यात लुटमार होण्याची किंवा दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये 52.99 पैशांकडे लागली आहे. माझ्यासाठी ही रक्कम अतिशय महत्त्वाची आहे. सीबीलच्या अटीमुळे बँकेचे पीककर्ज न मिळाल्याने सावकाराकडून दिडीतिडीने घेतलेले कर्ज पिक विम्याच्या या पैशातून सर्वप्रथम फेडीन. उभ्या पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करीन. तब्येत बरी नसतांनाही शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या बायकोला दवाखान्यात नेईन. गेल्या अनेक महिन्यांपासून फाटक्या पॅटेंत शाळेत जाणाऱ्या पोराला कपडे घेईन. वयात आलेल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करीन. अन् पूर्ण कुटुंबासह एकदा गुवाहाटीला पर्यटनासाठी जाऊन येईल आणि संकटग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरभराटी निर्माण करणाऱ्या देशी – विदेशी महागड्या गाड्यांचा प्रदर्शनासाठी पालकमंत्री संजय राठोड यांना भरीव आर्थिक देणगी देईन व उरलीसुरली रक्कम तिजोरी सांभाळून ठेवीन. म्हणून पीकविम्याची ही मदत माझ्या व माझ्या कुटुंबासाठी खुपचं महत्वाची आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम घरी नेतांना रस्त्यात लुटमारीची प्रचंड भिती वाटत असल्याने आपण मला पीकविमा रक्कमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलीस पुरवावे, अशी उपरोधिक मागणी शेतकऱ्यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांनी या मागणीद्वारे सरकारला फटकारले असून आपला संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी वाजत गाजत लोखंडी तिजोरी नेऊन पोलिस अधिक्षकांना संरक्षणासाठी अर्ज सादर केले. या मोर्चात देवानंद पवार, शैलेष इंगोले, अशोक भुतडा, प्रा. विठ्ठल आडे, संजय डंभारे, उमेश इंगळे, बंडु जाधव, घनशाम अत्रे, संगीत काळे, रामधन राठोड, रामचंद्र राठोड, वासुदेव राठोड, रणजीत जाधव, अमोल बेले, प्रदीप डंभारे, अरुण ठाकुर, लालसिंग अजमेरकर, कुणाल जतकर यांच्यासह मोठया संख्येत शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी विमा दिला कि भीक अशा शब्दात शेतकरी नेते देवानंद पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत . जिल्ह्यातील आठ लाख 44 हजार शेतकऱ्यांनी 509 कोटींचा विमा हप्ता भरला होता. यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तीन हजार 177 कोटी रूपये नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटी 10 लाख रूपयेच दिले. जवळपास आठ लाख शेतकरी विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचीत आहे. दुसरीकडे ज्यांना भरपाई मिळाली त्यात अनेकांना पाच पन्नास रुपये देऊन त्यांची थट्टा करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला की भीक हे आता स्पष्ट करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.