मच्छरदाणीसारख्या साड्या दिल्या, आदिवासी महिला नवनीत राणांवर संतापल्या

खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेसाठी अमरावतीतून उमेदवारी मिळाली आहे. पण, स्थानिक आदिवासी महिला मात्र नवनीत राणा यांच्या साडीवाटपावरून त्यांच्यावर संतापल्या आहेत. .या महिलांनी राणा यांनी वाटलेल्या साड्यांची तुलना मच्छरदाणीशीही केली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

दरवर्षी नवनीत राणा मेळघाटात होळी साजरी करतात. यंदा मात्र आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने होळी पूर्वीच मेळघाटात जाऊन राणा दांपत्याने साडीवाटप केलं. मात्र, या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या. त्यांनी या साड्यांच्या निकृष्ट दर्जावरून नवनीत राणा यांना खडेबोल सुनावले आहेत.

होळीच्या सणाला साडी वाटली तर ती किमान बऱ्या दर्जाची द्यायला हवी होती. अशी मच्छरदाणीसारखी तलम साडी नेसून आमची अब्रु काय झाकली जाणार आहे? त्यामुळे राणा यांनी आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी महिलांनी दिली आहे.