भाजप आणि मिंधेगटाबाबत जनतेमध्ये प्रचंड तिरस्कार – विनायक राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मी 106 खळा बैठका घेतल्या. या खळा बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता ठाम उभी आहे. त्या उलट भाजप आणि मिंधे गटाबाबत जनतेत प्रचंड तिरस्कार आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजप जे काही करत आहे, त्याबाबत जनतेमध्ये प्रचंड चीड दिसून आली. प्रचारादरम्यान तोकांनी मला प्रचंड प्रेम दिले. हे प्रेम मतदानामध्ये दिसेल असा विश्वास इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार विनायक राऊत आज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, माझ्या विरोधात महायुतीचा कोण उमेदवार आहे, याचा विचार मी करत नाही. जो कोणी उमेदवार असेल त्याला पराभूत करणार हे निश्चित. महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही की त्यांना उमेदवार मिळत नाही? असा खोचक सवाल करताना महायुतीच्या उमेदवारीला मी फारसे महत्व देत नाही असे खासदार राऊत यांनी सांगितले.

नारायण राणेंनी उमेदवारी का जाहीर होत नाही याचा विचार करावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, नारायण राणेंनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांना अजून उमेदवारी भाजपने का जाहीर केली नाही याचा विचार करावा अशी खोचक टीका राऊत यांनी केली. यावेळी संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर, ज्योतिप्रभा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.