आम्ही अदानीला प्रश्न विचारला, चमचे का वाजत आहेत? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसआयटीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यावरूनही त्यांनी सरकारला घेरले. आता त्यांना मिर्ची गोड लागत आहे का, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्या असताना त्यावर चर्चा करण्याऐवजी ते अधिवेशन भरकटवत आहेत. तसेच मुंबईतील उद्योग ते गुजरातमध्ये पळवत असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

नागपूरमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशातील अशा महत्त्वाच्या कंपनीमध्ये स्फोट होणे गंभीर बाब आहे. येथे सुरक्षेची व्यवस्था असणे गरजेचे आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. अधिवेशनाता याबाबत आम्हांला बोलू दिले, हे आपले नशीबच आहे. याबाबत सविस्तर चर्चा होईल तेव्हा हा अपघात आहे की घातपात, सुरक्षाविषयक बाबींकडे लक्ष दिले जात होते किंवा नाही, हे स्पष्ट होईल. यापुढे योग्य ती काळजी घेतली जाईल, अशी आपण अपेक्षा करत आहोत, असेही ते म्हणाले.

नागपुरात अधिवेशन घेतले जाते, तेव्हा राज्यासह विदर्भाच्या प्रश्नावरही चर्चा होण्याची गरज असते. मात्र, अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा, हे लावा, ते लावा अशी करण्यात आली, त्यावेळेलाच त्यांना अधिवेशन भरकटवायचे असल्याची शंकेची पाल मनात चुकचुकली होती. दुरान्वयेही कोणाचा कशाशीही संबंध नसताना एसआयटी चौकशी लावण्यात येते. अशावेळी आम्ही दिलेल्या पुराव्यांची दखल घेत, चौकशी आणि अभ्यास करून उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले असते, तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.

अधिवेशनात नवाब मलिक यांचा मुद्दा चर्चेत आला. देशद्रोहाचा आरोप असलेला व्यक्ती सत्तेत आपल्यासोबत नको, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने आमचा उर अभिमानाने भरून आला होता. मात्र, बाजूला बसलेल्या माणसाला थेट सांगण्यापेक्षा त्यांना पत्र लिहून ते सर्वांसमोर सादर केले. हा देशभक्तीचा ज्वलंत नमुना होता. त्यावर आम्ही त्यांना प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांच्याबाबत सवाल केला. नवाब मलिक यांच्यावर त्यांनी कोणते गोमूत्र शिंपडले की ते पवित्र झाले, किंवा वॉशिंग मशीनमध्ये कोणती पावडर टाकली की ते स्वच्छ झाले, असा सवालही त्यांनी केला. असे असताना प्रफुल्ल पटेलांचे काय, यावर अजूनही उत्तर मिळालेले नाही.

या विषयावर उत्तर आले नाही. मात्र, आज त्यांनी ज्या तत्परतेने खुलासा केला, ती तत्परता खरेच धन्य आहे. असे असताना राज्य कोण चालवतय, असा प्रश्न पडतो. आम्ही सत्तेत असताना आमच्यासोबत जे होते, त्यावरून आरोप करत होतात, आता तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. आता तेच शेण खात आहेत. आता त्यांनी यावर चर्चा करण्यापेक्षा एका निवेदनात विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून सत्य बाहेर आल्यावर आम्हालाही आनंदच होईल. त्या लग्नाला मंत्री होते की नाही, याची चौकशी तर करा. मात्र, तपास, चौकशी करण्याएवजी ते थेट निकाल घेऊनच आले, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

शेतकरी जी मिर्ची पिकवतात, ती त्यांना महत्त्वाची नसून दाऊदची मिर्ची त्यांना महत्त्वाची वाटते. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, नापिकी अशा समस्या आहेत. घोषणा अनेक होतात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. आश्वासनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे हे सरकार आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हे सरकार आहे. पिकविम्याचे काय झाले काहीही माहिती नाही. सरकारचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या कंपन्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या मनात आले म्हणू लावा एसआयटी, करा चौकशी असे सुरू आहे. पिकविमा कंपन्यांच्या कारभाराबाबत एसआयटी का लावत नाही, असा सवालही त्यांनी केला.

जुन्या पेन्शन योजनेबाबतही त्यांनी फक्त मधाचे बोट लावले आहे. पुढच्या अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत हे सरकार टिकले पाहिजे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शपथ घेणाऱ्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, हे त्यांनी सांगायला हवे. यावर आता चर्चा कसली सुरू आहे. आम्ही पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धारावीत आम्ही मोर्चा काढत प्रश्न अदानीला केला मात्र, आता चमचे का वाजत आहोत. अर्धवट माहितीवर कोणीही प्रश्न विचारू नये, त्यांनी घेतलेल्या शालीचे वजन त्यांना पेलते आहे की नाही, ते बघावे.असा टोलाही त्यांनी कोणचेही नाव न घेता लगावला. धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आम्हाला धारावीचा विकास हवा आहे. या मोर्चाला धारावीची माणसे नव्हती, असा आरोप होत आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. तिथून ही माणसे आणली होती, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. या मोर्चातील धारावी आणि मुंबईच्या प्रश्नांवर बोला, माणसे कुठली होती, याचा संबंध काय, मुंबई विकण्यासाठी अदानींची चमचेगिरी करणाऱ्यांची लाज वाटते. जर भाजप मोर्च्यात असती तर सेटलमेंट झाले असते, अशा शब्दांत त्यांनी भाजपला फटकारले.

मुंबईतील हिरे व्यवसाय त्यांनी सूरतला नेला, याचा खेद आहे. गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देश एवढा कमजोर आहे काय, मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी देशाचा विचार करायला हवा. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे विधान केले असते तर समजण्यासारखे आहे. मात्र, पंतप्रधानच असे विधान करत आहेत. हे त्यांना शोभत नाही. मुंबईतील उद्योग त्यांनी तेथे नेला आहे. हिरे व्यापाऱ्यांना दमदाटी करून ते उद्योग तेथे नेत आहेत. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजराचे मुख्यमंत्री आहेत, असा प्रश्न पडतो. मुंबईच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होईल, असे ते करत आहेत, असेही ते म्हणाले.प्रफुल्ल पटेल आता त्यांना जवळचे वाटायला लागले आहेत, त्यांना वाटेल त्यांना आत टाकायचे, त्यांच्याकडे गेले की बाहेर काढायचे, असे चालले आहे. एवढा निर्लज्ज कारभार म्हणजे उघडानागडा कारभार याआधी राज्यात कधीही नव्हता, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.