देशाला लागलेली राजकीय कीड आपण मारणारच! उद्धव ठाकरेंचा विश्वास

भाजप आणि राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसैनिकांचं श्रद्धास्थान ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं. पण त्याचवेळी जे आपल्या सोबत आले आहेत त्यांचं स्वागत केलं. काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो. आपण पडलेलो नाही, आपल्यासोबत गद्दारी केली गेली आणि मग तो चढतो आणि चढलेला तो पडतो. त्यामुळे जो चढला आहे तो पडणार आणि त्याला पाडणारच अशा निश्चयाने तुम्ही आला आहात, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना आपण संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती त्यांनी देताच उपस्थितांमध्ये चैतन्य संचारलं. मी राज्यात कुटुंब संवादाला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात जाईन आहे असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरणार, असं त्यांनी सांगितलं.

‘महाराष्ट्रात या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चिड, संताप आहे’, असं नमूद करायला देखील ते विसरले नाहीत.

‘मी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता जी गुंडागर्दी, फोडाफोडी सुरू आहे, तर तुम्ही जे आयुष्य खर्ची घातलं ते याज साठी केला होता अट्टहास म्हणून घातलं होतं का? तुम्ही घरदार कुटुंबावर निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला सतरंज्या उचलायला लावून तुमच्या डोक्यावर उपरे बाजारबुणगे बसवेल जाताहेत हे तुम्हाला पसंत आहे का? आणि भाजपचं हे भाडोत्री हिंदुत्त्व तुम्हाला मान्य आहे का?’ असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावरून देखील उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आणि आयोगासह सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं.

‘काल राष्ट्रवादी काँग्रेसच्याबाबती निवडणूक आयोगाने निकाल दिला तो तसा द्यायला पाहिजेच होता. कारण तो तसा दिला नसता तर सुप्रीम कोर्ट जो हातोडा आपल्या निकालावेळी ते मारतील अशी आहे तो आताच मारला असता’, असं ते म्हणाले.

पुढे चोरच न्यायाधीश झाल्याची गोष्ट सांगताना त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. ‘एकदा चोर आला आणि खोटी कागदपत्र देऊन चोरच न्यायाधीश झाला अशी बातमी आपण वाचली. त्या चोराने अनेक चोरांना सोडून दिलं. कोर्ट सुट्टीवर असताना हा प्रकार घडला. नंतर हे उघड झालं तेव्हा त्याला विचारण्यात आलं हे केलं कसं? तेव्हा त्याने सांगितलं की साध्या चोऱ्या केल्या त्यांना सोडलं पण ज्यांनी बलात्कार, दरोडेखोर, मारेकरी यांनी सोडलं नाही, अशी कबुली त्याने दिली. तेवढी नैतिकता त्याच्यात होती. आता एवढीसुद्धा नैतिकता भाजप मध्ये राहिली नाही. दिवसाढवळ्या हे सगळं सुरू आहे आणि ही कीड ती आपल्या देशात इतर प्रादेशिक पक्ष मारतीलच पण महाराष्ट्रातही कीड मारण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आलात म्हणून स्वागत करतो आणि शिवसेनेत आलात म्हणून कधीही पश्चाताप करावा लागणार नाही अशी ग्वाही देतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.