वेब न्यूज – एलियन्स आणि पृथ्वी

एलियन्स अर्थात परग्रहवासी हा जगातील कोटय़वधी लोकांचा अत्यंत आवडता विषय. या विषयावरच्या अनेक कथा, कादंबऱया आणि चित्रपटांनी गर्दीचे आणि कमाईचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. जगातील कानाकोपऱयातील अनेक लोकांनी त्यांनी एलियन्सला पाहिल्याचे, त्यांना एलियन्सने पळवून नेऊन त्यांच्यावर काही प्रयोग केल्याचे दावेदेखील केले आहेत. अमेरिकेनेदेखील नुकतेच काही उडत्या तबकडय़ासारख्या वस्तू पाहिल्या गेल्याचे आणि त्यावर अधिक संशोधन चालू असल्याचे कबूल केले होते. परदेशात तर अनेकांनी एलियन्स फॅन क्लबदेखील स्थापन केले आहेत, जे वारंवार एलियनसंदर्भात विविध दावे करत असतात.

एलियन्सच्या शोधासाठी जगातील प्रमुख देश जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी विविध साधनांचीदेखील मदत घेतली जात आहे. अशातच काही संशोधकांनी एलियन्स आणि त्यांची पृथ्वीभेट यासंदर्भात रंजक खुलासे केले आहेत. या संशोधकांच्या मते, गेल्या करोडो वर्षांत असे होऊ शकते की, काही परग्रहवासीयांनी पृथ्वीला भेट दिली असेल किंवा ती दिली असेल तर भविष्यातदेखील ते पृथ्वीला भेट देऊ शकतील, पण कथाकल्पना काही सांगत असल्या तरी एलियन्सना पृथ्वीवर येण्यासाठी दोन मोठय़ा अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यातली एक अडचण वैज्ञानिक आहे आणि एक तांत्रिक.

एलियन्सना पृथ्वीवर येण्यासाठी प्रकाशाच्या गतीच्या वेगाने प्रवेश करावा लागेल आणि या गतीशी बरोबरी करेल अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. दुसरे म्हणजे, समजा अशी गती प्राप्त केली तरी या गतीमुळे जी ऊर्जा निर्माण होईल, त्या ऊर्जेतदेखील टिकून राहील असे कोणतेही साहित्यदेखील सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे असे टिकाऊ यान बनवणेदेखील अशक्य आहे. मात्र जर भेट देणारे एलियन्स अधिक प्रगत असतील आणि त्यांनी या अडचणींवर मात केली असेल तर? असा प्रश्न या संशोधनाला विरोध करणारे काही दुसरे संशोधक विचारत आहेत.