…तर मी माफी मागते! जया बच्चन यांनी राज्यसभेतील निरोपाच्या भाषणात माफी का मागितली?

jaya-bachchan

संसदेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या आठवड्यात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर टीका करत खिल्ली उडवली. आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागताना, बच्चन म्हणाल्या की त्या चटकन चिडतात आहे परंतु कोणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नसतो.

‘लोक मला नेहमी विचारतात की मला राग का येतो. हा माझा स्वभाव आहे, मी स्वतःला बदलू शकत नाही. जर मला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा मला मान्य नसेल, तर माझी शांत राहू शकत नाही’, असं बच्चन म्हणाल्या.

‘मी तुमच्यापैकी कोणाशीही अयोग्य वागले असेल किंवा वैयक्तिक टिका केली असेल तर मी माफी मागते’, असं त्या म्हणाल्या.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या योगदानाची आठवण करून, उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की त्यांनी केलेल्या बुद्धीपूर्वक चर्चेची उणीव जाणवत राहील आणि त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण होईल.

‘आमच्या आदरणीय सहकाऱ्यांच्या निवृत्तीमुळे निःसंशयपणे एक पोकळी निर्माण होईल. प्रत्येक सुरुवातीचा अंत असतो आणि प्रत्येक शेवटाला नवीन सुरुवात असते, असं म्हटलं जातं’, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

मंगळवारी, धनखड यांनी एक प्रश्न वगळल्याबद्दल काँग्रेस नेत्यावर केलेल्या टिप्पणीमुळे जया बच्चन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्यांनी सांगितलं की हा मुद्दा त्यांना समजावून सांगितला असता तर सदस्यांना समजलं असतं आणि हे न समजायला ते ‘शालेय विद्यार्थी नाहीत’. खासदारांना आदरानं वागवलं पाहिजे असंही त्यांनी सुनावलं होतं.